आज दिनांक: ०५/०८/२०२१. 🎰 दिनविशेष🎰. जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

 

 

************

५ ऑगस्ट

'मुगल-ए-आझम' प्रदर्शित

************

 

'मुगल-ए-आझम' या चित्रपटाचा शुभारंभ ५ ऑगस्ट १९६० रोजी मुंबईतील मराठा मंदिरया चित्रपटगृहात झाला. आगाऊ तिकीट मिळविण्यासाठी एक लाखाहून अधिक मंडळी चित्रपटगृहा बाहेर जमली होती. उच्चभ्रू प्रतिष्ठितांना राजांच्या खलित्यासारखे, उर्दू निमंत्रण फर्मान धाडण्यात आले होते. चित्रपटाची सर्व रिळे हत्तीच्या पाठीवरून चित्रपटगृहात आणण्यात आली. चित्रपटगृहा बाहेर शीशमहालचा सेट आणून पुन्हा उभारण्यात आला होता.

 

'मुगल-ए-आझम' बनवण्यासाठी के.असिफ यांना असंख्य अडी अडचणी येत राहिल्या. हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी तब्बल १० वर्षे लागली. प्रदर्शीत झाल्यावर मात्र या चित्रपटाने अक्षरश: इतिहास घडवला. तिकीट खिडकीवरचे सर्व उच्चांक या चित्रपटाने मोडीत काढले. या चित्रपटाचे निर्माते शापूरजी पालनजी आणि दिग्दर्शक के.असिफ होते.

 

चित्रपटाचे चित्रीकरण इतके खर्चिक होते की, निर्मात्याचे दिवाळे वाजते की काय, अशी स्थिती अनेकदा निर्माण होई. यामधील युद्धाच्या चित्रीकरणासाठी २००० उंट, ४०० घोडे आणि ८००० सैनिकांचा वापर केला गेला होता. मधुबालाने घातलेले साखळदंड खरेखुरे होते. जोधाबाईंच्या महालातील कृष्णजन्म सोहळ्यासाठी श्रीकृष्णाची, खऱ्या सोन्याची मूर्ती वापरली गेली.

 

सव्वातीन तासाच्या चित्रपटात सर्व गाणीच मुळी सुमारे १ तासाची होती. प्यार किया तो डरना क्याया गाण्याच्या चित्रीकरणासाठी १५० फूट लांब, ८० फूट रुंद आणि ३५ फूट उंच असा खराखुरा शीशमहाल त्यावेळचे दीड कोटी रुपये खर्चून उभारला होता. अभिनय, कलावंताची निवड, भव्य सेटस्, रंगभूषा, वेषभूषा,अप्रतिम संगीत व गाणी, दमदार संवाद, युद्धाचे भव्य प्रसंग यातील अनेक सैनिक हे भारतीय खरेखुरे सैनिक होते.

 

पार्श्व संगीत, पटकथा, सिनेमाटोग्राफी, दिग्दर्शन, सर्वच बाबतीत हा चित्रपट हिन्दी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरला. यात वापरण्यात आलेली प्रत्येक वस्तू खरी होती. दागिने, साड्या, तलवारी, तोफा, साखळदंड, संगीत साहित्य, शीस महल सर्व काही अस्सल होते. अमान (झिनत अमानचे वडील), कमाल अमरोही, वजाहत मिर्झा, एहसान रिझवी यांनी त्यातील बहुतांशी संवाद उर्दूत लिहले होते. त्याकाळी व आजही हे संवाद समजायला अवघड वाटत असले तरी चित्रपट बघताना कुठेही बाधा येत नाही.

 

एका गाण्यात एकाचनवेळी पार्श्वगायनासाठी १०० लोकांनी कोरस दिला होता. कलकत्त्याच्या एकाच सिनेमागृहात हा चित्रपट वर्षभर चालला होता. चित्रपट गृहाच्या बाहेर लावलेले भलेमोठे पोस्टर्स व बॅनर्स बघायला प्रचंड गर्दी होत असे. त्याकाळात १५ मिलीयनचे बजेट असणाऱ्या या चित्रपटाने ५५ मिलीयनचा व्यवसाय केला. नंतर २००५ मध्ये हा चित्रपट रंगीत प्रिंट मध्ये कनव्हर्ट करून पुन्हा प्रदर्शीत करण्यात आला.

 

अवघे ४९ वर्षे जगलेल्या के.असिफ यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या २६ वर्षाच्या काळात फक्त साडेतीन चित्रपट तयार केले. त्यांचा 'लव्ह अण्ड गॉड' हा अर्धवट चित्रपट १९८६ ला प्रदर्शीत झाला होता. या चित्रपट निर्मितीची पण वेगळी कथा आहे (लैला मजनूची कथा) आणि त्यांनी ज्या तरूणाला आपल्या चित्रपटात संगीतकार म्हणून बोलावण्याचे वचन दिले होते तेही पूर्ण केले. ते म्हणजे संगीतकार नौशाद अली.

 

खरं तर मुगल-ए-आझम हा काही ऐतिहासिक चित्रपट नव्हता. अनारकली हे इतिहासातील एक संदीग्ध पात्र आहे. अनेक इतिहासकार अनारकली ही गोष्टीतली होती असे मानतात कारण ती असल्याचे पूरावे सापडत नाहीत. पण अस्सल ऐतिहासिक वाटावा अशी पार्श्वभूमी यात होती. त्यामुळे अनारकली ही खरोखरीच होती असे या चित्रपटामुळे ठाम समजूत आजही आहे.

 

मुगल ए आझमया चित्रपटाचं त्याकाळी हिंदी व्यतिरिक्त अन्य दोन भाषांमध्ये डबिंग करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त अन्य भाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी दिग्दर्शकांना हिंदी व्यतिरिक्त तामिळ आणि इंग्रजी भाषेमध्येही या चित्रपटाची निर्मिती व्हावी असं वाटतं होतं. त्यानुसार त्यांनी प्रयत्नही केले. मात्र त्याचे हे प्रयत्न अपयशी ठरल्याचं सांगण्यात येतं.

 

मुगल ए आझमया चित्रपटाच्या जाहिरातीसाठी किंवा एक आठवण म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत प्रथमच, उच्चभ्रू प्रतिष्ठितांना पत्त्यांचे २ कॅट्स पत्र्याच्या एका खास डब्यातून देण्यात आले. या पत्त्यांमध्ये, एका कॅट मधील प्रत्येक पत्त्यामागे दिलीपकुमारचे व दुसऱ्यामागे मधुबालाचे सुंदर चित्र छापले होते. चार एक्क्यांवर दोघांची चित्रपटातील प्रणयप्रसंगातील चित्रे छापली होती, तर पत्र्याच्या डब्यावरही या दोघांचे एक चित्र होते.

 

आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे या पत्त्यांमधील सर्व राजा आणि राणींच्या चेहेऱ्याच्या जागी अकबर (पृथ्वीराज कपूर) आणि जोधाबाई (दुर्गाबाई खोटे) यांचे चेहेरे छापले होते. कॅट मधील दोन जोकरवर मुघल ए आझमअसे छापले आहे.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट/मकरंद करंदीकर

 

************

************

५ ऑगस्ट

हत्तीरोग नियंत्रण दिन

************

 

५ ऑगस्ट हा 'हत्तीरोग दिन' म्हणून पाळण्यात येतो. महाराष्ट्रात वर्धा येथे हत्तीरोग संशोधन केंद्र आहे.

 

हत्तीरोग (लिम्फॅटिर फायलेरियासिस) हा डासांपासून मनुष्याला होणारा रोग आहे. या मध्ये रुग्णांचे पाय नि वृषण हे आकाराने जाड होतात व रुग्णास हालाचाल करणेही अवघड होवून बसते. हत्तीरोग हा शरीर विद्रूप करून अकार्यक्षम करणारा रोग असून सामान्यतः तो लहानपणात होतो.

 

हत्तीरोग हा 'क्युलेक्स विचकि फॅसिएटसनावाचा अळ्या ज्यांना मायक्रोफिलेरिई अळ्यांमुळे होतो. या अळ्या डासांच्या चाव्याद्वारे पसरतात. निरोगी व्यक्तीस डास चावल्यामुळे संक्रमण होते. हा रोग झाल्यानंतर त्यावर कोणताही परिणामकारक उपाय नाही. हत्तीरोग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून औषधांचे एकदाच सेवन करणे आवश्‍यक आहे.

 

१९५५ पासून भारत देशात राष्ट्रीय स्तरांवर हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालये, शासकीय संस्था वगैरेंमधून राबविण्यात येतो. भारतात हा रोग प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओरिसा, तमिळनाडू, केरळ, मध्यप्रदेश , असाम, कर्नाटक इत्यादी राज्यात आढळतो.

 

माणसांमध्‍ये लसिकाग्रंथिंच्‍या हत्‍तीरोगाचा प्रादुर्भाव गत ४००० वर्षापासून होत असावा, असे दिसून येते. १८६६ मध्‍ये लेविस, डिमार्क्यू आणि विचेरिया यांनी मायक्रोफायलेरिया व हत्‍तीरोगाचा परस्‍पर संबध असल्‍याचे स्पष्ट केले. १८७६ मध्‍ये जोसेफ बॅनक्रॉप्‍टी यांनी हत्‍तीरोगाचा पूर्ण वाढ झालेला जंतू शोधला. हत्तीरोग जंतूच्या जीवन चक्रासंदर्भात पॅटेट्रीक मॅन्‍सन आणि जॉर्ज कॉर्मिसेल यांचे संशोधन ही मोलाचे आहे.

 

हत्‍तीरोगाचा प्रसार सुतासारखा दिसणाऱ्या परोपजीवी कृमींमुळे होतो. भारतामध्‍ये ९८ टकके रुग्‍णांमध्‍ये हत्‍तीरोगाचा प्रसार बुचेरिया बॅनक्रॉप्‍टी या परोपजीवी कृमींमुळे झालेला आढळून येतो. भारतातील २५० जिल्‍हयांमध्‍ये स्‍थानिक स्‍वरुपात लागण झालेल्‍या हत्‍तीरोग रुग्‍णांची नोंद आहे. प्रौढ अवस्‍थेमध्‍ये हत्‍तीरोगाचे जंतू लसीका संस्‍थेच्‍या वाहिन्‍यांमध्‍ये राहतात. लसीका संस्‍था ही लसीका ग्रंथी आणि लसीका वाहिन्‍यांची बनलेली यंत्रणा असून ती शरीरातील रोगप्रतिकार शक्‍ती अबाधित ठेवण्याचे कार्य करते.

 

लक्षणे :

हत्तीपाय रोगाची तशी किरकोळ लक्षणे दिसून येताता. थंडी वाजून येणे, ताप येणे. पाय दुखून येणे. वृषन आकराने जाड होणे. मनुष्याचे दोन्ही पाय, हत्तीच्या पायांसारखे जाड व मोठे होतात आणि हालचाल करण्यास अवघड होणे, इत्यादी लक्षणे सांगता येतात.

 

रोगकारक घटक :

मनुष्‍यांमध्‍ये फार पुर्वीपासून हत्‍तीरोगाचे जंतू आढळून येतात. सर्व वयोगटांमध्‍ये हत्‍तीरोगाची लागण होऊ शकते. तसेच स्‍त्री किंवा पुरुष दोघांना हत्‍तीरोग होऊ शकतो. मात्र हत्‍तीरोगाचा प्रादुर्भाव असणाऱ्या क्षेत्रात पुरुषां मध्‍ये हत्‍तीरोगाचे प्रमाण जास्‍त दिसून येते. वारंवार स्‍थलांतर करणाऱ्या लोकांमुळे एका भागातून दुसऱ्या भागात हत्‍तीरोगाचा प्रसार होतो.

 

रोगनिदान व् उपचार :

थंडी ताप किंवा इतर लक्षणे दिसून आल्याबरोबर, रक्त तपासणी करून हत्तीरोग चाचणी करून घ्यावी. रक्त तपासणीत हत्तीरोग दूषित रुग्ण आढळल्यास त्याला सहा दिवस उपचारानंतर एक दिवसाचा गॅप देऊन बारा दिवस डी.ई.सी. गोळ्या देतात. या गोळ्यांच्या सेवनाने रिॲक्शन येऊ शकते. उपचार कालावधी हा जास्त असल्यामुळे हत्तीरोग रुग्णाने डॉक्टरांना भेटून त्यांच्या सल्ल्यानेच संपूर्ण उपचार घेणे आवश्यक आहे. तेव्हाच या रोगांचे नियंत्रण होऊ शकते.

 

प्रतिबंधात्मक उपाय :

संपूर्ण समुदायाला सूक्ष्म अळ्या मरतील अशी औषधे देणे, आणि डासांचे नियंत्रण करणे या गोष्टींचा समावेश आहे. डासांचे चावे टाळणे हा प्रतिबंधाचा आणखी एक प्रकार आहे. हत्तीरोगाचे जंतू पसरवणारे डास हे सामान्यतः संध्याकाळी आणि पहाटे चावतात. हत्तीरोगाचे प्राबल्य असलेल्या भागात आपण राहात असाल तर पुढील खबरदारी घ्या. मच्छरदाणी किंवा कीटनाशक मारलेल्या मच्छरदाणीचा उपयोग करावा. संध्याकाळ ते पहाटेच्या दरम्यान उघड्या त्वचेवर डास निवारक लावावे.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

५ ऑगस्ट

गणितज्ञ नील्स आबेल जन्मदिन

************

 

जन्म - ५ ऑगस्ट १८०२

स्मृती - ६ एप्रिल १८२९

 

अवघे सव्वीस वर्ष आयुष्य लाभलेला गणितज्ञ नील्स आबेल यांचा जन्म ५ ऑगस्ट १८०२ रोजी झाला.

 

आकाशात एखादा चमकता तारा दिसावा आणि क्षणार्धात नाहीसा व्हावा अस आयुष्य म्हणजे आबेलचे. फक्त २६ वर्षे आणि ८ महिन्यांचे आयुष्य पण यात काय नाही? गरिबी आहे, पण त्या गरिबीत निराशा नसून स्वाभिमान आहे. संस्कार आहेत, बुद्धीमत्ता आहे, प्रेम आहे, विरह आहे आणि कारुण्यही आहे. एखादा चित्रपट निघावा अशी आबेलच्या आयुष्याची कथा.

 

५ ऑगस्ट १८०२ रोजी नॉर्वेमध्ये नील्स आबेल एका सुसंस्कृत घरात जन्मला. सुसंस्कृत असलं तरी घरात दारिद्र्य होते पण तरिही घरातील सर्व मेंबर हसतमुख असायचे. आबेलला लहानपणापासून गणिताची आवड नव्हती. वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत त्याच्या वडीलांनीच त्याला घरी शिकवलं व नंतर शाळेत घातलं. पण शाळेतील एका घटनेमुळे त्याचं आयुष्यच बदललं.

 

ज्या शाळेत आबेल शिकत होता, त्या शाळेतील शिक्षक अतिशय मारकुटे होते. एकदा एका शिक्षकांनी एका मुलाला इतका जबरदस्त चोप दिला की तो मुलगा मरण पावला. सगळेच या घटनेनं हादरले, त्या शिक्षकाला शाळेतून काढून टाकले आणि त्याच्या जागी नवा शिक्षक आबेलला मिळाला "बरंट मायकेल होबॉय". हाच त्याच्या आयुष्यात आलेला महत्वाचा माणूस.

 

होबॉय हा काही फ़ार मोठा गणितज्ञ नव्हता पण त्याला गणिताची चांगली जाण होती. होबॉयच्या मार्गदर्शनाखाली आबेलचे गणित खुलायला लागले. वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे आबेलच्या ६ भावंडांची आबेलवर आलेली जबाबदारी होबॉयला माहीत होती, म्हणून त्याने आबेलला आर्थिक भार हलका करण्यासाठी काही शिकवण्या मिळवून दिल्या इतकेच नव्हे तर त्याच्या पगारातील काही भागही आबेलला देत होता, कारण आबेल आणि त्याचं गणित कुठल्या दर्जाचं आहे याची त्याल पुरती जाणीव होती.

 

आबेलचं गणीतातील पहिलं सर्वात मोठं काम म्हणजे पाचवा घात असलेली क्विंटिक समीकरणं (४x^५ + ३x -१ = ०) यात x ची किंमत कशी काढणार? कारण क्वाड्रॅटिक समीकरणे ज्यात x चा घात २ असतो, सोडवण्याची पद्धत आपल्याला माहीत आहे पण जेव्हा x चा घात ५ असेल तेव्हा काय करायचे? बीजगणीतात हा सर्वात मोठा प्रश्न मानला जातो.

 

जवळपास ३०० वर्षे अनेक गणितज्ञ हे सोडवण्याचा प्रयत्न करत होते पण यश आले नव्हते, पण जेव्हा आबेलची या प्रकरणात नाट्यमय एंट्री झाली तेव्हा हा प्रश्न सुटला. कारण त्यानं यात मूलभूत शंका काढली ज्यावर कोणीच विचार केला नव्हता. ती म्हणजे जी पद्धत आपण क्वाड्रॅटीकसाठी वापरतो तीच पद्धत यासाठी वापरणे योग्य आहे का? कारण दोन्ही समीकरणांचे स्वरूप वेगळे आहे मग पद्धत एक वापरून कसे सोडवता येईल? आबेलच्या या सिद्धांतामुळे फ़क्त क्विंटिक समीकरणे सुटली नाहीत तर "मथेमॅटिकल अनॅलिसिस" अशी गणिताची नवी शाखाच जन्माला आली. आबेलच्या याच सिद्धांताचा वापर करून पुढे एवरिस्ट गॅल्व्हाने क्विंटिक समीकरणांचे उत्तर शोधण्याची पद्धत हुडकून काढली.

 

१८२५ साली म्हणजे वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी आबेलने क्विंटिक समीकरणांवर आधारीत एक शोधनिबंध तयार करून जर्मनीतील श्रेष्ठ गणिती गाऊसला पाठवला, तेव्हा गाऊसकडून त्याचे कौतुक होईल अस वाटले होते पण उलट 'या प्रश्नांवर काम करणार्‍यांमध्ये आणखी एका मूर्खाची भर पडली.' असं गाऊस म्हणाला होता.

 

गाऊसचा मृत्यू झाल्यावर ज्या पाकीटात आबेलने शोधनिबंध पाठवला होता ते पाकीट बंदच असलेले आढळुन आले होते, म्हणजे न वाचताच गाऊसने आबेलवर 'मूर्ख' असा शिक्का मारला होता. पण आबेलने मनाचे खच्चीकरण होऊ न देता पुढे ट्रांसेडेन्टल फ़ंक्शन्सवर आबेलने संशोधन करून आणखी एक शोधनिबंध त्याने कॉशीकडे दिला.

 

याकोबी नावाच्या गणितज्ञाशी पुढे आबेलची गणितात स्पर्धा सुरु राहिली. ही स्पर्धा निकोप अशीच होती. आबेल आणि याकोबी यांची गणितातील कारकीर्द जवळपास एकमेकांना समांतर अशीच धावली, पण आबेल याकोबीच्या थोडा पुढे होता. उलट पुढे याकोबीला गणितज्ञ म्हणून जी प्रतिष्ठा मिळाली ती वाट आबेलमुळेच त्याला मिळाली होती.

 

आबेलचा अकाली मृत्यू झाला नसता तर गणितात एक तगडी स्पर्धा याकोबीला सहन करायला लागली असती हे मात्र नक्की. फ़ुरिये नावाच्या गणितज्ञानेही आबेल आणि याकोबीच्या गणिताला विरोध केला. अजून साधं उष्णतेचं वहन कसं होतं हे माहीत नसताना माणसाला उपयोगी नसलेले गणित सोडवण्यात हे वेळ घालवत आहेत हेच त्याला पटायचं नाही. पण आज भौतिकशास्त्रात द्रव, स्थायू आणि वायू या अवस्थांसोबत प्लाझ्मा नावाची चौथी अवस्था असते आणि त्याच्याही पुढे बोस-आईन्स्टाईन कंडेंस्ड स्टेट नावाची पाचवी अवस्था असते असे मानले जाते. या स्टेट्मधील सर्व समीकरणे ही क्विंटिक समीकरणे असतात.

 

स्ट्रिंग थियरी, कॉस्मॉलॉजी यांसारख्या अनेक क्षेत्रात क्विंटिक समीकरणे, आबेलियन आणि याकोबियन समीकरणांचा उपयोग केला जातो. यदा कदाचित जर आज फ़ुरियेने पुनर्जन्म घेऊन आबेल-याकोबीच्या गणिताचे दैनंदिन जीवनातील उपयोग पाहिले असते तर फ़ुरीयेचे डोळे आश्चर्याने पांढरे झाले असते हे मात्र नक्की.

 

पुढे आबेलच्या आयुष्याने एखाद्या चित्रपटात शोभेल अशा कथानकाला साजेसे वळण घेतले. त्याची तब्येत बिघडली. आपण आता यातून वाचणार नाही याची त्याला पूर्ण खात्री झाली. त्याचे एका मुलीवर, क्रेलीवर प्रेम होते पण ती दिसायला फ़ारशी सुंदर नव्हती, तिच्या चेहर्‍यावर देवीचे व्रण होते. आपल्यानंतर क्रेलीचे काय होणार याचीच त्याला काळजी लागून राहिली होती. शेवटी आबेलने त्याचा मित्र किल्होला पत्र लिहिले, 'माझी प्रेयसी दिसायला फ़ारशी सुंदर नसली तरी लाखात एक आहे. माझ्या मृत्यूनंतर तू तिच्याशी लग्न कर.' विशेष म्हणजे किल्होने क्रेली दिसायला कशी आहे हे पाहिले नसतानाही केवळ मित्राच्या विनंतीवरून क्रेलीशी लग्न केले.

 

आबेलचे दुर्दैव इथेच संपत नाही. त्याने कॉशीकडे जो निबंध पाठवला होता तो त्याने दुसर्‍या एका दुय्यम दर्जाच्या गणितज्ञाकडे वाचायला दिला. त्याने पुढे पॅरिस अकॅडमीकडे पाठवला. तिथून पुनः कोषी आणि लिजेंडर या गणितज्ञांची त्यासाठी नेमणूक केली. लिजेंडर त्यावेळी ७४ वर्षांचा होता. बुद्धीची धार बोथट होऊन त्याला आबेलचे अक्षरही कळत नव्हते. नंतर कॉशीने तो निबंध घरी नेला आणि पुढे वाचायचे विसरूनच गेला. कुठे ठेवलाय हेही त्याला आठवेना. पुढे खूप दिवसांनी कसाबसा कॉशीने शोधून तो पुनः पॅरीस अकॅडमीकडे पाठवून दिला. पुनः अकॅडमीच्या संपादकीय महामंडळानं हरवला. या सर्व हरवाहरवीतून पुढे १८४१ मध्ये हा शोधनिबंध छापला गेला तेव्हा याकोबी आणि आबेल यांना अकॅडमीचं ग्रॅंड पारितोषिक मिळालं पण हे सर्व बघायला आबेल तेव्हा जिवंतच नव्हता.

 

६ एप्रिल १८२९ मध्येच आबेल हे विसराळू जग सोडून निघून गेला होता. तसेच ज्या याकोबीला आबेलमुळे गणिताची पुढील वाट सापडली होती त्या याकोबीची मात्र गाऊसने दखल घेऊन गणितासाठी शक्य ती मदत केली होती. होय, तोच गाऊस ज्याने या आबेलला 'मूर्खात' काढले होते. यावर कहर म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर दोनच दिवसांनी बर्लिनहून आबेलसाठी पत्र आले होते. वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी बर्लिन विद्यापीठात त्याची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : फेसबुक

 

************

************

@ ५ ऑगस्ट @

गायिका ज्योत्स्ना भोळे स्मृतिदिन

************

 

जन्म - ११ मे १९१४

मृत्यू - ५ ऑगस्ट २०११

 

गायिका नि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचा जन्म ११ मे १९१४ रोजी झाला.

 

बोला अमृत बोला, आला खुशीत समिंदर, क्षण आला भाग्याचा' यांसारख्या मधाळ गीतांनी एकेकाळी मराठी रसिकांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलविणाऱ्या ज्योत्स्ना भोळे या पूर्वाश्रमीच्या दुर्गा केळेकर. बालपणापासून त्यांना गायनाची व अभिनयाची आवड होती. ज्योत्स्ना भोळे यांना रंगभूमीवरील पहिल्या अभिनेत्रीचा मान मिळाला.

 

ज्योत्स्नाबाईंना अभिनया प्रमाणे आवाजाची दैवी देणगी होती. वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी प्रथम आंधळ्यांची शाळाया नाटकात भूमिका केली. या नाटकाचा प्रथम प्रयोग १ जुलै १९३३ रोजी मुंबईच्या रिपन थिएटरमध्ये झाला. या नाटकात त्यांनी नायिकेची म्हणजेच बिंबाची भूमिका केली. या नाटकाचे मुंबई व पुणे येथे शंभराहूनअधिक प्रयोग झाले. कंठसंगीतासाठी इतर गायिकांपेक्षा अगदी वेगळा असा खास आवाज होता. विवाहानंतर १९३३ साली त्यांचे पती केशवराव भोळे यांनी नाट्यमन्वंतरही संस्था काढली. या संस्थेने अनेक नाटकांचे प्रयोग केले.

 

अलंकारनाटकात वत्सलेची, ‘आराधनात देवकीची, ‘आशिर्वादमधील सुमित्रा, ‘एक होता म्हातारातील उमा, ‘कुलवधूमधील भानुती, ‘कोणे एके काळीमधील कल्याणी, ‘धाकटी आईमधील वीणा, ‘भूमिकन्या सीतामधील सीता, ‘रंभातील सुगंधा, ‘राधामाईमधील राधा तर 'विद्याहरणमधील देवयानी अशा अनेक नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या. या नाटकातील पदे त्यांनी गाऊन अजरामर केली.

 

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या दिवशी शिवाजी पार्क येथे झालेल्या कार्यक़्रमात त्यांनी कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हाहे गीत गाऊन एक इतिहासच रचला. या गीताला शंकरराव व्यास यांनी संगीतबद्ध केले. या गीताने महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण भारावले.

 

ज्योत्स्नाबाईंना अभिनय, गायन याबरोबर साहित्याचीही आवड होती. त्यांनी आराधनाया नाटकाचे लेखन केले. त्या अनेक वर्षे महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या अध्यक्षा होत्या.

 

१९९९ साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कारतर पुणे महानगर पालिकेतर्फे बालगंधर्व पुरस्कारअसे अनेक पुरस्कार मिळाले. अनुबंध प्रकाशन या संस्थेने त्यांचे आत्मचरित्र तुची ज्योत्स्ना भोळेहे प्रकाशित केले आहे.

 

ज्योत्स्ना भोळे यांचे निधन ५ ऑगस्ट २०११ रोजी झाले.

 

ज्योत्स्ना भोळे यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

५ ऑगस्ट

लेखक द. वा. पोतदार जन्मदिन

************

 

जन्म - ५ ऑगस्ट १८९० (रायगड)

स्मृती - ६ ऑक्टोबर १९७९

 

महामहोपाध्याय द. वा. पोतदार यांचा जन्म ५ ऑगस्ट १८९० बिरवाडी रायगड येथे झाला.

 

अखिल भारतीय कीर्तीचे इतिहास संशोधक, संस्कृत पंडित, साक्षेपी विचारवंत, उत्तम वक्ते, चालता-बोलता ज्ञानकोश, शैक्षणिक,  सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते असे अनेक नावलौकिक द. वा. पोतदार यांना मिळाले. १९१० ते १९७५ अशी सलग सहा-सात दशकं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनावर आपल्या सर्वंकष प्रतिभेचा ठसा उमटवत त्यांनी ते क्षेत्र अधिक समृद्ध आणि व्यापक केलं.

 

विद्योपासना हे पोतदारांचं कार्यक्षेत्रच होतं. विद्येचं कुठलंही अंग त्यांना अपरिचित नव्हतं. त्यामुळेच अध्यापनापासून ते शिक्षणसंस्थांचं नेतृत्व करण्यापर्यंत अनेक जबाबदाऱ्या त्यांनी लीलया पेलल्या. अनेक व्यापांत असूनही त्यांचा प्रचंड मोठा लोकसंग्रह होता.

 

द. वा. पोतदार यांचे शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात झाले. १९०६ मध्ये ते मॅट्रिक झाले त्यानंतर १९१० मध्ये पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून ते बी.ए. झाले. त्यानंतर त्यांनी न्यू पूना कॉलेजात इतिहास आणि मराठी ह्या विषयांचे अध्यापन केले. नूतन मराठी विद्यालय मराठी शाळेचे व नूतन मराठी विद्यालयाचे अधीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांचे वडील सामाजिक कार्यात सक्रिय असल्यामुळे लोकमान्य टिळक, शि.म. परांजपे, इतिहासाचार्य राजवाडे, कवडेशास्त्री, न.चिं. केळकर, तात्यासाहेब करंदीकर अशा दिग्गज मंडळींत त्यांची ऊठबस होती. घरातील या वातावरणाचा परिणाम पोतदारांच्या जडण-घडणीवर झाला. पुढे त्यांनी एल.एल.बी. ला प्रवेश घेतला; पण तिकडे न जाता पुण्यातीलच शिक्षण प्रसारक मंडळीच्या सेवेत त्यांनी अर्धवेळ शिक्षक म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली.

 

अत्यंत मूलग्राही पद्धतीने तरीही रंजकपणे ते अध्यापन करीत. विषयाशी संबंधित अनेक संदर्भ ते विद्यार्थ्यांना देत, त्यामुळे विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून ते नावाजले गेले. ७ जुलै १९१० ला इतिहासाचार्य राजवाडे आणि खं.चि. मेहेंदळे यांनी पुण्यात भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली त्या वेळी पोतदारांचा तिथे प्रवेश झाला तो राजवाडे यांचं बोट धरूनच. राजवाड्यांच्या सहवासामुळे इतिहास आणि भटकंती यांची आवड त्यांच्यात निर्माण झाली. इथेच त्यांच्या इतिहास संशोधनाला प्रारंभ झाला. अनेक प्रकारची ऐतिहासिक कागदपत्रं धुंडाळण्याच्या व्यासंगातून त्यांनी सारा महाराष्ट्रच नव्हे, तर पेशावर, तक्षशिला, बनारस, कोलकता, राजस्थान, मद्रास, तंजावर अशा देशाच्या चारी दिशा पिंजून काढल्या. इतिहास संशोधनासाठी ते काही वेळा परदेशातही जाऊन आले.

 

द. वा. पोतदार यांनी केलेल्या अव्याहत विद्याव्यासंग मुळे त्यांना पुढील पदव्या प्राप्त झाल्या : केंद्र शासनाने महामहोपाध्यायही पदवी दिली (१९४८). हिंदी साहित्यसंमेलनाने त्यांना साहित्यवाचस्पतिही उपाधी प्रदान केली. वाराणसेय विश्वविद्यापीठ व पुणे विद्यापीठ यांनी डि.लिट्. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.

 

केंद्र शासनाने ठरविलेल्या पंडितांपैकी ते एक होते. १९१५ साली ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळी ह्या संस्थेचे आजीव सदस्य झाले. १९३३ ते १९३६ ह्या काळात ते महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक होते. १९४६ ते १९५० ह्या काळात ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या अध्यक्षपदी होते. १९३९ मध्ये अहमदनगर येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष, तसेच १९४३ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष होते. १९४६ ते १९५० ह्या काळात संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.

 

१९४८ मध्ये पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले. नंतर १९६० ते १९६३ ह्या काळात पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरू होते. १९३९ ते १९४२ ह्या काळात हिंदुस्थानी बोर्डाचे ते सदस्य होते. १९४२ मध्ये ह्या बोर्डाचे ते अध्यक्ष झाले. तसेच १९५० ते १९५३ ह्या काळात हिंदी शिक्षण समितीचे ते अध्यक्ष होते. काही वर्षे ते संस्कृत महामंडळाचेही अध्यक्ष होते.

 

त्यांनी दोन संस्था नव्याने स्थापन केल्या. "मॉडर्न इंडियन हिस्टरी काँग्रेस" (१९३५). हिची पुण्यास स्थापना करून तिचे पहिले अधिवेशन पुण्यासच भरविले. पण पुढील अलाहाबाद येथील अधिवेशनात तिचे नाव इंडियन हिस्टरी काँग्रेस असे झाले. या संस्थेच्या दिल्ली येथे भरलेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते. 'महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा' या संस्थेचे ते अध्यक्ष होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या बौद्धिक मार्गदर्शनात त्यांनी भाग घेतला होते. मराठी शुद्धलेखन महामंडळाचेही काही वर्षे ते अध्यक्ष होते. तमाशा सुधारणा समितीचे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनी बहुमोल कामगिरी केली आहे. त्यांचा इतिहासाचा अभ्यास फार मोठा होता.

 

प्राचीन मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास ह्या विषयांवर त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नियतकालिकांत आणि अन्यत्रही बरेच स्फुट लेखन केले आहे. दत्तो वामन पोतदार हे आयुष्यभर अविवाहित होते.

 

प्राचीन मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास ह्या विषयांचा त्यांचा विशेष व्यासंग. तत्संबंधी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नियतकालिकांत आणि अन्यत्रही त्यांनी बरेच स्फुट लेखन केले आहे. मराठी गद्याचा इंग्रजी अवतार हा त्यांचा ग्रंथ अव्वल इंग्रजीच्या कालखंडातील मराठी साहित्येतिहास लिहिण्याचा प्रारंभीचा प्रयत्न म्हणून उल्लेखनीय आहे. ह्या कालखंडातील मराठी गद्याच्या जडणघडणीचे सप्रमाण दर्शन या ग्रंथात घडविण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र साहित्यपरिषद इतिहास, वृत्तविभाग व साधन विभाग ह्या त्यांच्या पुस्तकात मराठी साहित्यिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या आरंभीच्या कालखंडातील कार्याची माहिती आहे. त्यांनी संपादिलेल्या लहानमोठ्या ग्रंथांतील देवदासकृत संतमालिका आणि श्रीशिवदिनकेसरि विरचित ज्ञानप्रदीप हे विशेष उल्लेखनीय होत. प्रांतिक भाषांचे भवितव्य, भाषावार विद्यापीठे, महाराष्ट्रातील सौंदर्यस्थळे, पुरोगामी वाङ्‌मय दोन टिपणे, ऐतिहासिक चरित्रलेखन असे वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी केलेले स्फुट लेखन पोतदार विविध दर्शन ह्या पुस्तकात संग्रहीत आहे.

 

आयुष्याचा शेवटच्या काळातला मुक्काम त्यांनी पुण्याहून वाई इथे हलवला. तिथे आनंदीधाम या प्रशस्त वास्तूत ते राहू लागले. पण पुण्याशी त्यांच्या दीर्घकाळ जडलेल्या नात्यामुळे वाईत ते फार रमले नाहीत. त्यामुळे त्यांच्या सतत पुण्याच्या वाऱ्या होत असत. अविवाहित असलेल्या पोतदारांनी मृत्यूपूर्वी काही वर्षं आधी आपली वास्तू आणि त्या वास्तूत साठवलेला प्रचंड ग्रंथसंग्रह विश्वस्तपत्राद्वारे शिक्षण प्रसारक मंडळीच्या स्वाधीन केला होता. भारत सरकारने द.वा. पोतदार पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता.

 

द. वा. पोतदार यांचे निधन ६ ऑक्टोबर १९७९ साली झाले.

 

द. वा. पोतदार यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

५ ऑगस्ट

अंतराळवीर निल आर्मस्ट्रॉंग जन्मदिन

************

 

जन्म- ५ ऑगस्ट १९३०

स्मृती - २५ ऑगस्ट २०१२

 

नील आर्मस्ट्राँग हा एक अमेरिकन अंतराळयात्री, अंतरीक्ष अभियंता व लष्करी वैमानिक होता. आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाउल ठेवणारा जगातील पहिला मानव होता.

 

नासाचे अपोलो ११ हे अंतराळयान आर्मस्ट्राँगने २० जुलै १९६९ रोजी २०:१७:३९ यूटीसी ह्या वेळेला चंद्रावर उतरवले व त्यानंतर काही तासांत (२१ जुलै १९६९, २:५६ यूटीसी) त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाउल टाकले.

 

आर्मस्ट्राँग हे दोन तास ३२ मिनिटे आणि आल्ड्रिन हे त्यांच्यापेक्षा १५ मिनिटे कमी काळ चंद्रावर होते. त्यांनी अमेरिकेचा ध्वज तिथे फडकावला.

 

"ते मानवाचे एक छोटे पाऊल, सर्व मनुष्यजातीसाठी मोठी झेप आहे" असे आर्मस्ट्राँग यांनी पृथ्वीवासीयांना रेडिओ संदेशाद्वारे सांगितले होते.

 

https://www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान

 

************

************

५ ऑगस्ट

वृत्तनिवेदिका वेणूताई चितळे स्मृतिदिन

************

 

जन्म - २८ डिसेंबर १९१२ (कोल्हापूर)

स्मृती - ५ ऑगस्ट १९९४ (पुणे)

 

सीमा भेदणार मराठी आवाज !

 

१९४२ मधला बीबीसी मराठीचा पहिला आवाज म्हणजेच वृत्तनिवेदिका वेणूताई चितळे. वेणू चितळे हे एक प्रभावी व्यक्तिमत्त्व. १९४२ मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान बीबीसीनं मराठीतून प्रसारण सुरू केलं होतं. तेव्हा वेणू चितळे लंडनहून मराठीत आणि इंग्रजीतही बातम्या द्यायच्या. सत्तर ऐंशी वर्षांपूर्वीच्या काळात एका मराठी मध्यमवर्गीय मुलगी शिक्षणासाठी परदेशात जाते, बीबीसीसाठी वृत्तनिवेदन आणि वार्तांकन करू लागते, तेही युद्ध ऐन भरात असताना, हे सारंच आज रोमांचक वाटतं.

 

वेणूताईंचा जन्म १९१२ सालचा. वेणू जेमतेम सहा वर्षांची असताना त्यांच्या आईचं निधन झालं. त्यानंतर मोठ्या भावंडांनीच त्यांचा सांभाळ केला. आधी पुण्यात हुजूरपागा आणि मग मुंबईला सेंट कोलंबा शाळेत वेणूताईंचं शिक्षण झालं. वेणूताईंचं कुटुंब परंपरा जपणारं पण पुढारलेल्या विचारांचं होतं. कॉम्रेड विष्णू (भाई) चितळे आणि चितळे अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्सची स्थापना करणारे श्रीकृष्ण चितळे हे त्यांचे बंधू.

 

मुंबईच्या सेंट कोलंबा शाळेतच वेणूताईंना एक जीवाभावाची मैत्रीण मिळाली जोहाना अ‍ॅड्रियाना क्विन्टा ड्यू प्री म्हणजेच क्विनी. क्विनी खरं तर वेणूताईंची शिक्षिका, पण दोघींच्या वयांत फारसं अंतर नव्हतं. क्विनीच्या सल्ल्यानंच वेणूताईंनी पुढे शिकण्याचं ठरवलं आणि विल्सन कॉलेजलाही अ‍ॅडमिशनही घेतली. पण याचदरम्यान वेणूताईंच्या घरी त्यांच्या लग्नाविषयी चर्चा होऊ लागली. वेणूताईंच्या कन्या ज्योत्स्ना दामले आपल्या आईच्या आठवणी सांगतात, "एका ज्योतिषानं हिचं लग्न बहिणीसाठी त्रासाचं ठरेल" असं भाकित केलं. तेव्हा बहिणीवरच्या प्रेमापोटी तिनं लग्नच न करण्याचा निर्णय घेतला. लग्न नाही करायचं, तर पुढे काय? असा प्रश्न उभा राहिला. तेव्हा क्विनीनं तरुण वेणूला इंग्लंडला नेण्याची तयारी दाखवली. घरच्यांनीही विरोध केला नाही. क्विनीनं वेणूताईंना पाश्चात्य संस्कृतीची ओळख करून दिली, पण त्यांची भारतीय मुळं जपण्याचाही सल्ला दिला.

 

१९३४ साली वेणू इंग्लंडला रवाना झाल्या. तिथं त्यांनी आधी माँटेसरीचा कोर्स केला आणि मग लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज मध्येही दाखल झाल्या. पण याच सुमारास दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. मग भारतात परतण्याऐवजी वेणूताईंनी इंग्लंड मध्ये थांबण्याचा निर्णय घेतला. वेणूताईंवर दीर्घ अभ्यास आणि लेखन करणाऱ्या डॉ. विजया देव यांनी त्याविषयी अधिक माहिती दिली. "त्यांच्या या निर्णयामागचं कारण काही पत्रांतून स्पष्ट होतं. ज्या देशानं आपल्याला नवी दिशा दिली, त्या लोकांचं आपण काही देणं लागतो, या भावनेतून वेणूताईंनी स्वयंसेवक म्हणून काम करण्याचं ठरवलं. तेही साडी, गमबूट आणि वर जड हेल्मेट अशा अवतारात. त्या काळात वेणूताई अधूनमधून भाषांतराचं कामही करत असत. त्यांचा एक लेख पाहून माहिती मंत्रालयातील अधिकाऱ्यानं वेणूताईंना बीबीसीमध्ये धाडलं."

 

१९४० साली वेणूताई बीबीसी मध्ये दाखल झाल्या. आवाज, बोलण्याची आणि लिहिण्याची शैली पाहून वेणूताईंना लगेचच प्रसारणाचं काम देण्यात आलं. १९४२-४३ दरम्यान बीबीसीच्या ईस्टर्न सर्व्हिसनं अनेक भारतीय भाषांत प्रसारण सुरू केलं. त्यात मराठीचाही समावेश होता. वेणूताई प्रामुख्यानं याच विभागासाठी काम करत असत. प्रख्यात लेखक जॉर्ज ऑरवेल या विभागाचे प्रमुख होते. वेणूताईंचं वृत्तनिवेदन, इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व याचं त्यांनीही कौतुक केलं आहे. ऑरवेल सह टी.एस. इलियट, मुल्कराज आनंद, बलराज सहानी, प्रिन्सेस इंदिरा कापुरथळा, झेड.ए. बुखारी अशा मातब्बरांसोबत काम करण्याची संधी वेणूताईंना मिळाली.

 

बीबीसीवरून प्रसारित होणाऱ्या 'रेडिओ झंकार' या मराठी कार्यक्रमाची आखणी, लेखन, निवेदन, अशी कामं वेणूताई करत असत. वेणूताई मराठीतून युद्धाच्या बातम्या देत असत आणि इंग्रजीतूनही वृत्तनिवेदन करत असत. 'इंडियन रेसिपीज', 'किचन फ्रंट' सीरीज द्वारे त्यांनी ब्रिटिशांना भारतीय खाद्य पदार्थांची ओळखही करून दिली.

 

"त्या एक मन लावून काम करणारी, बुद्धिमान, सौम्य मुलगी म्हणून प्रसिद्ध होत्या. त्यांच्यात एक घरगुतीपणा होता. सर्वांशी त्या खेळीमेळीनं वागत.

राजकीय विचारांच्या बाबतीत त्यांची मतं कोणत्याही एका विचारसरणीकडे झुकलेली नव्हती" असं मुल्कराज आनंद यांनी 'सखे सोयरे' पुस्तकासाठी लेखिका विजया देव यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.

 

इंग्लंड मध्ये असतानाही वेणूताईंना मायदेशातल्या परिस्थितीचीही जाणीव होती. त्यामुळंच वेणूताई इंडिया लीगसाठी काम करू लागल्या. व्ही.के. कृष्ण मेनन यांची ही संघटना ब्रिटनच्या नागरिकांमध्ये आणि परदेशातील भारतीयांमध्ये भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रसार करत असे. त्याशिवाय वेणूताई 'ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्स' मध्येही सहभागी झाल्या. या परिषदेतच वेणूताईंची विजयालक्ष्मी पंडित यांच्याशीही मैत्री जुळली.

 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर वेणू चितळे मायदेशी परतल्या, त्या कायमच्याच. त्यानंतर वेणूताईंनी दिल्लीत विजयालक्ष्मी पंडित यांची मदतनीस सचिव म्हणून जबाबदारी सांभाळली. दिल्लीतल्या वास्तव्या दरम्यान वेणूताई फाळणीनंतर पंजाबातून आलेल्या निर्वासित स्त्रिया आणि मुलांच्या छावणीतही काम करत असत.

 

वेणू चितळे यांची पहिली कादंबरी 'इन ट्रान्झिट' ही १९५० साली प्रकाशित झाली. त्या काळात एखाद्या मराठी लेखिकेनं इंग्रजीत लिखाण करणं हेही अप्रूपच होतं. त्याच वर्षी, ३९ वर्षांची असताना वेणूताईंनी गणेश खरे यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि वेणू चितळेची सौ. लीला गणेश खरे झाली. गणेश यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यांच्या मुलांनाही वेणूताईंनी आपलंसं केलं. लग्ना नंतरही वेणूताईंनी 'इनकॉग्निटो' ही आणखी एक कादंबरी लिहिली. नवशक्ती सारखी विविध वृत्तपत्रं आणि मासिकांत त्या स्तंभ, लेख लिहित असत. ऑल इंडिया रेडियोवरूनही त्यांच्या काही श्रुतिका प्रसारित झाल्या. पण बराच काळ घरापासून दूर राहिलेल्या वेणूताईंनी मग घरालाच आपलं विश्व बनवलं आणि संसाराला जास्त प्राधान्य दिलं.

 

इंग्लंड मधल्या, खास करून बीबीसी मधल्या दिवसांचा मात्र वेणूताईंना कधीच विसर पडला नाही. वेणूताईंची लेक नंदिनी आपटे यांना त्या इंग्लंड मधल्या आठवणी सांगत असत. आईनं सांगितलेल्या आठवणींची उजळणी करताना नंदिनी आपटे म्हणाल्या, "ऐन युद्धाच्या धामधुमीत इंग्लंड मधलं जीवन सोपं नव्हतं. कधी कधी खंदकात राहून काम करावं लागे, हे ती आम्हाला सांगायची. तिला मोठ्ठ्या आवाजाचा खूप त्रास व्हायचा. दिवाळीतले फटाकेही चालत नसत. कारण ते तिला युद्धाची आठवण करून द्यायचे."

 

आयुष्यभर संघर्ष आणि युद्ध पाहिलेल्या वेणूताईंच्या लिखाणात आणि बोलण्यात त्या संघर्षानंच एक वेगळी संवेदनशीलताही आणली. डॉ. विजया देव यांनी वेणूताईंच्या आयुष्याचं नेमक्या शब्दांत असं वर्णन करून ठेवलं आहे. "वेणूताईंचा स्वभाव मुद्दाम काही वेगळं करून दाखवायचं असा नव्हता. पण आयुष्याला सामोरं कसं जायचं याचं शहाणपण त्यांच्याकडे होतं. जे वाट्याला आलं, त्याला त्या अतिशय सकारात्मकरित्या सामोऱ्या गेल्या. मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. हे असं जगता आलं पाहिजे" असे डॉ. विजया देव यांनी वेणुताई बद्दल लिहिलं आहे.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : जान्हवी मुळे/बीबीसी मराठी

 

************

************

५ ऑगस्ट

शिवाजीराव निलंगेकर पाटील स्मृतिदिन

************

 

जन्म - ९ फेब्रुवारी १९३१

स्मृती - ५ ऑगस्ट २०२०

 

शिवाजीराव निलंगेकर पाटील हे मराठी, भारतीय राजकारणी होते. ३ जून १९८५ ते ६ मार्च १९८६ या कालखंडात ते महाराष्ट्राचे दहावे मुख्यमंत्री होते. तसेच ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. हा कालखंड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांतील काळजीवाहू सरकारवजा सगळ्यात छोटा कालखंड आहे.

 

आपल्या मुलीच्या एम.डी. परीक्षेतील मार्क वाढवून घेण्याबद्दल झालेल्या कोर्ट केस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढल्यावर निलंगेकर यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

 

शिवाजीराव पाटील हे राजकारणात विविध पदांवर होते. राज्यमंत्रिमंडळात सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, संसदीय कार्य, आरोग्य, तंत्रशिक्षण, दुग्धविकास, विधी व न्याय, सहकार, सांस्कृतिक कार्य.

 

मुख्यमंत्रीपद भूषविल्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात ते महसूल हे खाते सांभाळत होते. १९९० ते १९९१ या काळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी होते.

 

त्यांचे राजकीय वारसदार पुत्र कै. दिलीप हे आमदार होते. सून रुपाताई या लातूरच्या माजी खासदार होत्या. नातू संभाजी हे निलंग्याचे माजी आमदार (आजोबांचा पराभव करून आमदारकी).

 

मुख्यमंत्रीपदाचा कालावधी : ३ जून १९८५ ते १३ मार्च १९८६ (पक्ष -काँग्रेस). पहिल्यांदा आमदार १९६२ मध्ये निलंगा मतदारसंघ.

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

५ ऑगस्ट

होंडा कंपनी संस्थापक सोईचिरो होंडा स्मृतिदिन

************

 

जन्म. १७ नोव्हेंबर १९०६

स्मृती - ५ ऑगस्ट १९९१

 

होंडा कंपनीचे संस्थापक सोईचिरो होंडा यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९०६ रोजी झाला.

 

यश हा आपल्या कामाचा एक टक्का भाग असून ९९ टक्के कामाचा परिणाम आहे, त्याला अपयश म्हटले जाते, असे सोईचिरो होंडा यांचे मत होते.

 

सोईचिरो होंडा यांचे बालपण वडिलांसोबत सायकल दुरुस्त करण्यात गेले. हायस्कूल मध्ये असताना त्यांनी ऑटोमोबाइल आणि गॅसोलिन इंजिनची दुरुस्ती करणाऱ्या टोकियो आर्ट शोकाईया कंपनीची जाहिरात पाहिली. त्याच वेळी सोइचिरो यांनी या कंपनीत काम करण्याचे ठरवले. मात्र, जी जाहिरात त्यांनी पाहिली ती कोणत्याही नोकर भरतीची नव्हती. तरीदेखील त्यांनी प्रशिक्षण घेण्यासाठी कंपनीला पत्र लिहिले अन वयाच्या १५ व्या वर्षी ते हायस्कूलचे शिक्षण अपूर्ण सोडून आर्ट शोकाईकंपनी जॉइन करण्यासाठी टोकियोत पोहोचले. तेथे त्यांना कामाच्या माेबदल्यात फक्त पॉकेटमनी मिळत असे.

 

कंपनीचे मालक युजो साकाकीबारा यांनी होंडा यांच्यातील अभियंता ओळखून त्यांची मोटार स्पोर्ट्स मध्ये रुची निर्माण केली. सन १९२३ मध्ये साकाकीबारा यांनी रेसिंग कार बनवणे सुरू केले व होंडा त्यांना मदत करू लागले. १९२४ मध्ये त्यांनी बनवलेल्या कर्टीस कारने जपान ऑटोमोबाइल स्पर्धा जिंकली. २० व्या वर्षी होंडा यांना सैन्यदलात नोकरीसाठी बोलावण्यात आले; परंतु रंगांधळेपणा मुळे त्यांना डावलण्यात अाले.

 

१९२८ मध्ये २२ वर्षांचे असताना त्यांनी आपले शहर हामामात्सूत आर्ट शोकाईची शाखा उघडली व तेथे दुरुस्तीशिवाय इतर कामेही सुरू केली. या कंपनीने फायर इंजिन बनवले आणि डंप ट्रकपासून बस बनवण्याचे काम सुरू केले. जेव्हा शाखा सुरू झाली तेव्हा फक्त एक कर्मचारी होता. मात्र, १९३५ पर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या ३० झाली.

 

७ जून १९३६ राेजी एका रेस मध्ये होंडा यांचा अपघात झाला. त्यात ते किरकाेळ जखमी झाले; परंतु त्यांचा लहान भाऊ गंभीर जखमी झाला. ऑक्टोबर मध्ये त्यांनी आणखी एका रेस मध्ये भाग घेतला. मात्र, वडील रागावल्याने आणि पत्नी नाराज झाल्यामुळे त्यांनी रेसिंगची अावड साेडली. होंडा यांनी हामामात्सू शाखेला पिस्टन रिंग मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये रूपांतरित करण्याची योजना बनवली; परंतु त्यांच्या गुंतवणूकदाराने त्यांना असे करण्यास नकार दिला. कारण, नवे काम सुरू करणे त्यास अनावश्यक वाटले. मात्र, या याेजनेला मूर्त स्वरूप देण्याचा होंडा यांनी निश्चय केला होता. त्यासाठी शिचिरो काटो या अाेळखीच्या व्यक्तीच्या मदतीने सन १९३७ मध्ये त्यांनी स्वत:ची टाेकाई सेकी हेवी इंडस्ट्रीस्थापन केली. काटो या कंपनीचे अध्यक्ष बनले. या काळात जपान चीनसोबत युद्धात सहभागी झाला होता. होंडा हे दिवसा आर्ट शोकाईमध्ये काम करत आणि रात्री आर्ट पिस्टन रिंग रिसर्च सेंटरमध्ये जायचे.

 

दोन वर्षांच्या कठोर मेहनतीनंतर पिस्टन रिंगची चाचणी यशस्वी झाली. त्यांनी आर्ट शोकाईची हामामात्सू शाखा प्रशिक्षणार्थींना सोपवून दिली आणि ते टाेकाई सेकीकंपनीत अध्यक्ष म्हणून सहभागी झाले. मात्र, तरीही त्यांचा संघर्षाचा काळ संपलेला नव्हता. कारण टोयोटाकंपनीसाठी त्यांनी तयार केलेल्या ५० पिस्टन रिंगची पहिली ऑर्डर फेल गेली. केवळ तीनच रिंगा टोयोटाच्या गुणवत्तेवर टिकल्या. त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंगचे तंत्र शिकण्यासाठी होंडा जपानच्या अनेक कंपन्यांमध्ये गेले. दोन वर्षांनंतर ते चांगल्या गुणवत्तेच्या पिस्टन रिंगांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आणि टाेयोटानाकाजिमा एअरक्राफ्टसारख्या कंपन्यांना त्यांचा पुरवठा करण्यात यशस्वी झाले.

 

पॅसिफिक युद्धकाळात ७ डिसेंबर १९४१ मध्ये त्यांच्या कंपनीला जपानी सैन्याने ताब्यात घेतले. सन १९४२ मध्ये टोयोटाकंपनी टोकाइ सेकीकंपनीत ४० टक्के भागीदार बनली आणि होंडा यांना सीनियर मॅनेजर बनवले. या काळात कंपनीतील पुरुष कर्मचारी सैन्यात भरती झाले आणि महिला कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक कामाची जबाबदार घेतली. जपानवर हवाई हल्ले वाढू लागले होते. युद्धानंतर झालेल्या भूकंपात इवाटा प्लांट देखील नष्ट झाला. ऑगस्ट मध्ये जपान युद्ध हरले आणि त्यानंतर जपान व होंडा यांचे जीवन पूर्णपणे बदलून गेले.

 

देशाची आर्थिक स्थिती व इन्फ्रास्ट्रक्चर सोबत ऑटोमोबाइल मार्केट नष्ट झाले हाेते. तसेच इंधनाची कमतरताही भासू लागली. त्यामुळे अधिकाधिक जपानी नागरिक सायकलचा वापर करू लागले. याच काळात होंडा यांनी ५० सीसीचे टू-स्ट्रोक इंजिन आणि सायकल पासून मोटारसायकल बनवण्याची कल्पना आणली.

 

१९४६ मध्ये ४० वर्षीय होंडा यांनी होंडा रिसर्च टेक्निकल इन्स्टिट्यूटची स्थापना केली. तसेच १९४९ मध्ये २० कर्मचाऱ्यांसोबत होंडा मोटार कंपनीसुरू केली. त्यानंतर त्यांनी काळासोबत मोटाराइज्ड बायसिकलच्या डिझाइनमध्ये जपानी ग्राहकांच्या सुविधेसाठी अनेक बदल घडवले. १९६० मध्ये होंडा यांनी उत्तर अमेरिकेच्या बाजारात पाऊल टाकले.

 

त्यांच्या माेटारसायकलने कितीतरी ग्रँड प्रिक्स, मोटोक्रॉस आणि इनड्युरो स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यांची कंपनी १९८० च्या सुरुवातीला जपानची सर्वात मोठी आटोमोबाइल कंपनी बनली.

 

होंडा यांचे ५ ऑगस्ट १९९१ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ :  इंटरनेट

 

************

************

५ ऑगस्ट

अभिनेत्री काजोलचा वाढदिवस

************

 

जन्म - ५ ऑगस्ट १९७४ (मुंबई)

 

अनेक हिंदी चित्रपटांतून आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकणाऱ्या काजोलचा आज वाढदिवस.

 

सध्याच्या् काळात आघाडीच्या आणि नामांकित अभिनेत्री मध्ये समावेश होत असलेल्या काजोलचे कुटुंब चित्रपट उदयोगात अनेक वर्षांपासून आहे. आई तनूजा मराठी कुटुंबातली, वडील चित्रपट निर्माते शोमू मुखर्जी बंगाली. मावशी नुतन सर्वाधिक पाच वेळा फिल्म फेअर पुरस्कार पटकावलेली नामांकित अभिनेत्री. पणजी रतन बाई आणि आजी शोभना समर्थ यांच्या वारशाखाली तयार झालेली काजोल. इतकेच नव्हे तर काका जॉय मुखर्जी आणि देव मुखर्जी हे देखिल त्यांच्या काळातील गाजलेले कलावंत.

 

शाळेत शिकत असतांना तिला पहिला ब्रेक मिळाला. काजोलचा पहिला चित्रपट बेखुदीहा होता. काजोलने 'बेखुदी' या चित्रपटाच्या माध्यामातून जेव्हा बॉलीवूडमध्ये प्रवेश केला तेव्हा तिच्या पदरी पडली साफ निराशा. काजोल दिसायला सर्वसामान्य् तरुणींसारखीच सामान्य. पण 'बाजीगर' मध्ये नवख्या शाहरुख सोबत आपल्याय अभिनयाची चुणूक दाखवत तिने बॉलीवूडमधले आपले स्थान पक्के केलेच. या जोडीने नंतर मग अनेक हीट चित्रपट दिले.

 

शाहरुखच्या यशामागे काजोल सोबत जमलेली केमिस्ट्री हा देखिल महत्वांचा विषय म्हणला पाहिजे.  मात्र त्यानंतरच्या अनेक चित्रपटात तिने अनेक उल्लेखनीय भुमिका केल्या. त्यात हळुवार प्रेमाची अनुभूती देणारी दिलेवाले. मधली सिमरन असो किंवा 'गुप्त' मधली आक्रमक खलनायिका अनेक चित्रपटात तिने अभिनयाची जादुगरी दाखविली.

 

त्यानंतर तिने शाहरूख सोबत करण अर्जुन, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, कुछ कुद होता है आणि कभी खुशी कभी गम यारखे अनेक हीट चित्रपट केले. त्या‍तील 'दिलवाले' मध्ये आजही जोरदार गर्दी खेचण्याची क्षमता आहे. या चित्रपटानेच तिला पहिल्यांदा उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कारही मिळवून दिला.

 

काजोल आणि अजय देवगन यांनी १९९९ मध्ये लग्न केले. दोघांची भेट 'हलचल' चित्रपटाच्या सेटवर झाली होती. हळू हळू दोघांची दोस्ती आणि प्रेम जुळले. त्यांचे लग्न पारंपरिक मराठी पद्धतीने झाले होते.  बॉलीवूड मध्ये लग्न झालेल्या हिरोईनचे करीअर नंतर पूर्णतः संपल्याचे अनेक उदाहरणे आहेत. मात्र लग्नानंतरही काजोलने पती अजय सोबतही यशस्वी चित्रपट केले. त्यात 'कभी खुशी कभी गम' या हीट चित्रपटाचाही समावेश आहे.

 

काजोलच्या नावावर आतापर्यंत उत्कृष्ट अभिनेत्रीचे सर्वात जास्त फिल्मफेअर अवॉर्ड्स आहेत. या चित्रपटासाठी तिला उत्कृष्ट् अभिनेत्रीचे अनेक पुरस्कार मिळाले. तर तिसरा फिल्म फेअर पुरस्कार ही पटकाविला. आमीर खान सोबत तिने 'फना' हा तर पती अजय सोबत 'यु मी और हम' हा हीट चित्रपट दिला. तर शाहरुखच्या 'ओम शाती ओम' मध्ये  आपल्या नृत्या चे जलवे दाखविले. तिने पतीसोबत चित्रपट निर्मिती व्यवसायातही पाउल टाकले आहे.

 

काजोलला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

५ ऑगस्ट

अभिनेत्री जेनेलिया डिसोझा चा वाढदिवस

************

 

जन्म - ५ ऑगस्ट १९८७ (मुंबई)

 

चित्रपट अभिनेत्री जेनेलिया डिसोझा यांचा आज वाढदिवस.

 

जेनीलिया डिसूझा या भारतीय चित्रपट अभिनेत्री आहेत. तेलुगू चित्रपटातील त्या एक आघाडीच्या नायिका आहेत.

 

तेलुगू खेरीज त्यांनी तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटांतूनदेखील अभिनय केला आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटाद्वारे जेनेलिया यांनी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.

 

जेनीलिया डिसूझा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया/इंटरनेट

 

************

_________                            🎰 दिनविशेष🎰.                                          

◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆                       विजय दिन

महत्त्वाच्या घटना:

२०१६    :    ब्राझिलमधे रिओ-डी-जानिरो येथे ३१ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात होणार आहे.

१९९७    :    रशियाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन सोयूझ-यूहे अंतराळयान मीरअंतराळस्थानकाकडे रवाना

१९९७    :    फ्रेन्च खुल्या लॉनटेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरी गटात विजेतेपद मिळवणार्‍या महेश भूपतीला क्रीडा खात्यातर्फे २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर

१९९४    :    इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी (INSA) तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कारराष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेले (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियन राजगोपाल यांना प्रदान

१९६५    :    पाकिस्तानी सैन्याने साध्या वेषात घुसखोरी केल्यामुळे भारत पाकिस्तान युद्धाला सुरूवात झाली.

१९६२    :    नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९० मधे त्यांची सुटका झाली.

१९६२    :    कन्या नक्षत्रात पहिल्या क्‍वासारतार्‍याचं अस्तित्त्व सिद्ध करण्यात यश

१८६१    :    अमेरिकन सैन्यातील चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा बंद करण्यात आली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७५    :    काजोल अभिनेत्री

१९७२    :    अकिब जावेद पाकिस्तानी जलदगती गोलंदाज

१९६९    :    वेंकटेश प्रसाद जलदगती गोलंदाज

१९३३    :    विजया राजाध्यक्ष लेखिका व समीक्षिका, ७४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा

१९३०    :    नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव (मृत्यू: २५ ऑगस्ट २०१२)

१८९०    :    महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू [१९६१-१९६४], टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू [१९४८], पद्मविभूषण, मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष, प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचे व्यासंगी (मृत्यू: ६ आक्टोबर १९७९)

१८५८    :    वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्रीखरे इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी (मृत्यू: ११ जून १९२४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००१    :    ज्योत्स्‍ना भोळे संगीत रंगभूमीला नवचैतन्य देणार्‍या गायिका आणि अभिनेत्री. संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९७६), विष्णूदास भावे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, महाराष्ट्र विशेष गौरव पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार इ. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.

२०००    :    लाला अमरनाथ भारद्वाज भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य, स्वतंत्र भारताच्या पहिल्या क्रिकेट संघाचे कर्णधार व स्वतंत्र भारताचे पहिले शतकवीर

१९९७ :    के. पी. आर. गोपालन स्वातंत्र्यसैनिक, कम्युनिस्ट व नक्षलवादी नेते

१९९२    :    अच्युतराव पटवर्धन स्वातंत्र्यसैनिक, ४२ च्या चळवळीतील अग्रणी नेते, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्त्वचिंतक व सामाजिक कार्यकर्ते  ◆━━━━━━━▣✦▣━━━━━━━━◆

        © प्रश्नमंजुषा                                                       ~~~~~~.                                                 १)मुलीची पहिली शाळा पुण्यात कोणी चालू केली?                                                                             २)लोकमान्य कोणाला म्हणतात?                                                                                                ३)इंग्रज भारतात कश्यासाठी आले होते?                                                                                                                                         ▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬                                           🎯 ठळक घडामोडी

▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬

  सोलापूर: दीड महिन्याने आली १ली ते ८वीची पाठ्यपुस्तके आजपासून होणार वाटप.    

अकरावीसाठी प्रवेश परीक्षेत वैकल्पिक प्रश्न ▬▬▬▬۩۞۩▬▬▬▬                                                                  संकल्पना /संकलन :.                                             घोडके संजय सर.                                             मो.९७३७१११२७७.                                                                                                                    शिक्षक विचार मंच पुणे.                    ======★■◆●=========                                     🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 slg

 

No comments:

Post a Comment