१८ ऑगस्ट ❀ स्मृतिदिन = 📆 दिनविशेष 📆 जन्मदिन

 

१८ ऑगस्ट

हेलियम डे

************

 

आज हेलियम डे !

 

सिंधुदुर्ग मधील देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्यावर १८ ऑगस्ट १८६८ रोजी वातावरणातील हेलियम वायूचा शोध लागला. हेलियमचे पाळणाघर अशी ओळख असलेला आणि पराक्रमाची गाथा सांगणारा किल्ले विजयदुर्ग पर्यटका बरोबरच आता अभ्यासकांनाही साद घालीत आहे.

 

जगात कुठेही हेलियम डे साजरा केला जात नाही, मात्र विजयदुर्ग किल्ल्यावर हेलियम वायूचा शोध लागल्यामुळे गेली अकरा वर्षे हेलियम डे साजरा केला जात आहे. विजयदुर्ग किल्ल्यावर साहेबाचे ओटे या ठिकाणी हेलियम डे साजरा करण्यात येतो. अलीकडे हाच दिवस 'हेलियम डे' म्हणून साजरा करण्यामुळे याविषयी जागृती वाढली.

 

ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून विविध मान्यवरांसह विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम करून 'हेलियम डे' साजरा होतो. यामुळे या ऐतिहासिक किल्ल्यावर विज्ञानप्रेमींची गजबज वाढते.

 

सिंधुदुर्गातील सर्वात प्राचीन जलदुर्ग म्हणून किल्ले विजयदुर्गकडे पाहिले जाते. ११९५ ते १२०५ या कालावधी मध्ये शीलाहार घराण्यातील राजा भोज याने किल्ल्याची निर्मिती केली. शिवाजी महाराज यांच्या आरमारा मध्ये या किल्ल्याला मोठे महत्त्व होते. मराठ्यांच्या आरमारात या किल्ल्याला सर्वोच्च स्थान होते.

 

ऐतिहासिक ठेवा असलेल्या किल्ले विजयदुर्गने आठशेहून अधिक वर्षांत अनेक स्थित्यंतरे अनुभवली. त्यातीलच एक म्हणजे हेलियम वायूचा शोध. त्यामुळे केवळ ऐतिहासिक घटनांचाच नव्हे; तर वैज्ञानिक संदर्भानेही किल्ले विजयदुर्गची ओळख तयार झाली.

 

१८ ऑगस्ट १८६८ या दिवशी किल्ले विजयदुर्गने विलक्षण घटना अनुभवली. ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर जे. नॉर्मन लॉकियार यांनी याच दिवशी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी किल्ले विजयदुर्ग ही जागा निश्चिघत केली. अक्षांश, रेखांशाच्या दृष्टीने ग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी ही जागा त्यांना संयुक्ति्क वाटली.

 

दुर्बीण ठेवण्यासाठी त्यांनी तेथे लहान दगडी चबुतरा बांधला होता. त्याला पुढे 'सायबांचे ओटे' असे संबोधले जाऊ लागले. ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेला किल्ले विजयदुर्ग खगोलशास्त्रज्ञांसाठी सुद्धा हेलियमचे शोधस्थान म्हणून महत्त्वाचा ठरला आहे.

 

सर जे. नॉर्मन लॉकियार यांनी दुर्बिणीवर स्पेक्ट्रो्मीटर चढवून १८ ऑगस्ट १८६८ ला सूर्यग्रहणाचा अभ्यास केला. ग्रहणकाळ सकाळी ८ वाजून २१ मिनिटांनी सुरू झाला. त्यांनी दुर्बीण सूर्यावर रोखून ठेवली होती. ९.२४ ते ९.३२ या काळात खग्रास सूर्यग्रहण होते. या काळात त्यांना स्पेक्ट्रो ग्राफवर ५८७.४९ नॅनोमीटर लहर लांबी (व्हेवलेंग्थ) असलेली एक पीत वर्णरेषा दिसली आणि हा क्षण अभूतपूर्व ठरला.

 

या वर्णरेषेचा स्रोत हा सूर्याच्या तप्त वातावरणातील एका नवीन मूलद्रव्यात असला पाहिजे, असा निष्कर्ष त्यांनी काढला. त्याला त्यांनी हेलियम (ग्रीक भाषेत Helios म्हणजे सूर्य) नाव दिले. पुढे सुमारे २५ वर्षांनी विल्यम रामसे यांनी या पायावर कळस चढवला आणि हेलियमच्या शोधावर शिक्का मोर्तब केले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१८ ऑगस्ट

थोरले बाजीराव पेशवे जन्मदिन

************

 

जन्म - १८ ऑगस्ट १७००

स्मृती - २८ एप्रिल १७४०

 

थोरले बाजीराव हे जगातील मोजक्या अपराजित सेनापतींपैकी एक होते. त्यांना पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. रणधुरंधर असलेल्या पहिल्या बाजीरावाने आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा उत्तर भारतात विस्तारल्या.

 

थोरले बाजीराव पेशवे हे ६ फुट होते, असा इतिहासात उल्लेख आहे. भक्कम पिळदार शरीरयष्टी, तांबुस गौरवर्ण, निकोप प्रकृती, कोणीही मोहीत व्हावं असा मोहक चेहरा, तेजस्वी कांती, न्यायनिष्ठुर स्वभाव, असे उमदे व्यक्तीमत्व असल्याने कोणावरही त्यांची सहज छाप पडे.

 

भपकेबाज पोशाखाचा त्यांना तिटकारा होता. स्वत: बाजीराव पांढरे किंवा फिकट रंगाचे कपडे वापरी. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करण्यावर त्यांचा भर होता. नोकरा शिवाय त्यांचे अडत नसे. त्यांचे खाजगी ४ घोडे होते - निळा, गंगा, सारंगा आणि अबलख. अगदी त्यांचे दाणावैरण पाणी ते स्वत: बघत.

 

खोटेपणा, अन्याय, ऐषाराम त्यांना अजिबात खपत नसे. उभ सैन्य त्यांच्या करड्या शिस्तीत तयार झाले होते. उण्यापुऱ्या ४० वर्षांच्या आयुष्यात थोरले बाजीराव यांनी अतुल पराक्रम गाजवला. १७२० मध्ये पेशवाई त्याच्या कोवळ्या खांद्यावर आली. मृत्यूपर्यंत त्यांनी २० वर्षात अनेक लढाया केल्या. त्यात माळवा (डिसेंबर,१७२३), धर (१७२४), औरंगाबाद (१७२४), पालखेड (फेब्रुवारी,१७२८), अहमदाबाद (१७३१) उदयपुर (१७३६), फिरोजाबाद (१७३७), दिल्ली (१७३७), भोपाळ (१७३८), वसईची (१७ मे १७३९) या आणि अशाच ३६ मोठ्ठ्या लढायांचा समावेश आहे. आणि सगळ्याच लढाया थोरले बाजीराव पेशवे जिंकले आहेत. एकदाही पराभूत न झालेला जगाच्या इतिहासातील हा एकमेव सेनापती आहेत.

 

पहिल्या बाजीराव यांनीच पुण्याला शनिवारवाडा बांधला आणि साताऱ्याच्या राजगादी इतकेच महत्त्व पुण्याला मिळवून दिले. दिल्लीचा वजीर मोहम्मद खान बंगेश याने छत्रसाल बुंदेलावर आक्रमण केले. तेव्हा त्याच्या समोर छत्रसालला शरणागती पत्करावी लागली. बंगेश हा औरंगजेबाच्या हाताखाली शिकलेला असल्याने शिस्त व चिकाटी हे गुण त्यात पुरेपूर उतरले होते. त्याने ८० वर्षांच्या छत्रसालला छावणीत बंदिस्त केले. मात्र छत्रसाल बुंदेला बंगेशचे बारसे जेवला होता. आपण शरण आलोय असे भासवून त्याने हेरांमार्फत बाजीरावाला एक पत्र पाठवले. कारण, दिल्लीला ताळ्यावर आणेल असा तोच एकच परमप्रतापी पुरुष भारतात होता.

 

पत्र मिळाल्यावर टाकोटाक ३५-४० हजारांची फौज घेउन खुद्द बाजीराव, मोहम्मद खान बंगेशवर चालून गेला. ही हालचाल इतकी त्वरेने केली की बाजीराव धडकेपर्यंत मोहम्मद खान बंगेशला काहीच समजले नाही. बेसावध बंगेश एका गढीत अडकला. बाजीरावाच्या झंजावाता पुढे मोगल हैराण झाले. खुद्द बंदीस्त वजीरानेच "बम्मन होने के बावजुद क्या समशेर चलाता है?" अशी स्तुति केली.

 

या मदतीने खुश होउन छत्रसालने वार्षिक बत्तिस लाखाचे उत्पन्न असलेला मुलुख बाजीरावास नजर केला. इतकेच नव्हे तर आपल्या अनेक उपपत्नींपैकी एकीची मुलगी मस्तानी बाजिरावास दिली, जेणेकरून बुंदेल्यांचे व मराठ्यांचे रक्तसंबध जुळतील. या शिवाय बाजीरावास 'काशीबाई' ही प्रथम पत्नी होतीच.

 

काशीबाई पासून बाजीरावास रामचंद्र उर्फ रघुनाथराव, जनार्दन व बाळाजी उर्फ नाना असे ३, तर मस्तानी कडून समशेरबहादूर उर्फ कृष्णराव असे एकुण ४ पुत्र होते. कर्मठ ब्राह्मणांनी मस्तानी मुसलमान असल्याने बाजीरावावर बहिष्कार घातला होता, पण बाजीरावाचा दराराच जबर होता, त्याने कोणालाच जुमानले नाही.

 

मस्तानीकरीता शनिवारवाड्यातच महाल बांधून घेतला. चिमाजी अप्पा हे बाजीराव यांचे धाकटा भाऊ. चिमाजी अप्पा यांनी देखील कोकण घाट आणि किनाऱ्यावर मराठीसत्तेचा भगवा फडकवत ठेवला.

 

थोरले बाजीराव पेशवे यांचे २८ एप्रिल १७४० रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१८ ऑगस्ट

उर्दू शायर बशर नवाज जन्मदिन

************

 

जन्म - १८ ऑगस्ट १९३५ (औरंगाबाद)

स्मृती - ९ जुलै २०१५ (औरंगाबाद)

 

उर्दू शायर बशर नवाज यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३५ रोजी झाला.

 

तेज हो धुप तो और निखर आयेंगे, हम कोई फुल नही जों मुर्जा जायेंगेअशा तरल शायरीसाठी बशर नवाज देशभर प्रसिद्ध होते. समकालीन शायर गायकीतून श्रोत्यांना खिळवून ठेवत; मात्र शायरी वाचनातील वेगळेपणातून बशर नवाज यांनी नवा पायंडा पाडला. या वैशिष्ट्यामुळे देशभरातील हजारो मुशायरे त्यांनी गाजवले.

 

पाकिस्तान, सौदी अरेबिया, बांग्लादेश या देशातही नवाज यांच्या शायरीचा मोठा चाहतावर्ग होता. राहेगाँ’, अजनबी समंदया दोन कवितासंग्रहासह नया आदब नये मसायेंहा समीक्षाग्रंथ उर्दू साहित्यात मोलाची भर टाकणारा ठरला.

 

औरंगाबाद येथे १९५४ मध्ये झालेल्या अखिल भारतीय उर्दु मुशायऱ्या मध्ये त्यांनी पहिली गझल सादर केली. १९७१ मध्ये त्यांचा पहिला संग्रह रायगाँप्रकाशित झाला. १९७३ मध्ये त्यांचे नया अदब नये मसाईलहे समीक्षकपर लेखांचे पुस्तक प्रकाशित झाले. हे पुस्तक आजही उर्दु साहित्य विश्वातील एक महत्वाचे पुस्तक म्हणून गणले जाते.

 

१९९८ मध्ये प्रकाशित झालेली 'अजनबी समंदरया संग्रहातील गझल आणि नज्म रसिक वाचकांना प्रचंड भावल्या. २००८ मध्ये प्रकाशित झालेल्या करोगे याद तोया गझल संग्रहाने लोकप्रियतेचे नवे उच्चांक गाठले. बशर नवाज यांनी बाजार, लोरी, जाने वफा, तेरे शहर में, अशा अनेक हिंदी चित्रपटांकरिता गीते लिहिलेली असून महंमद रफी, लता मंगेशकर, आशा भोसले, मेहंदी हसन, गुलामअली, तलत अजीज, भूपेंद्र यांच्या सारख्या प्रख्यात गायकांनी बशर नवाज यांची गीते गायली आहेत. त्यांची बाजारया चित्रपटातील करोगे याद तो हर बात याद आएगीही गजल सर्वाधिक लोकप्रिय झाली होती. 

 

बशर नवाज यांनी लिहीलेल्या उर्दू गझल आणि कवितांचे आतापर्यंत मराठी, इंग्रजी, पंजाबी, गुजराती, कन्नड व इतर अनेक भाषांमध्ये अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. त्याचप्रमाणे प्रसिद्ध उर्दू शायर अमीर खुसरो यांच्या जीवनावर आधारित दूरदर्शन मालिकेसाठी १३ भागांचे संवाद लेखन तसेच आकाशवाणी आणि दुरदर्शनवरुन प्रसारित झालेल्या अनेक कार्यक्रमांचे लेखन बशर नवाज यांनी केले आहे.

 

त्यांच्या कविता व गझलांचा देशातील अनेक राज्यांमधील पहिली ते पदव्युत्तर पर्यंतच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश झाला होता. बशर नवाज यांचा १९६० नंतरचा देशातील उत्तुंग प्रतिभेचा कवी म्हणून शायर निदा फाजली यांनी गौरव केला होता. तर २०१० मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई नवमहाराष्ट्र युवा अभियान, विभागीय केंद्र औरंगाबाद तर्फे बशर नवाज यांच्या जीवनावर माहितीपटाची निर्मिती करण्यात आली होती.

 

महाराष्ट्र उर्दू साहित्य संस्था, फक्र ए महाराष्ट्र, महाराष्ट्र उर्दू अकादमी, गालीब अकादमी या संस्थांच्या पुरस्कारांनी बशर नवाज यांना सन्मानित करण्यात आले होते. २०१४ मध्ये बशर नवाज यांना दिल्ली येथील गालिब अकॅडमीचा उर्दू भाषेतील प्रतिष्ठेचा गालिब पुरस्कारदेण्यात आला होता. माजी राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी नवी दिल्ली येथे स्थापन केलेल्या गालिब अकॅडमीतर्फे दरवर्षी उर्दू क्षेत्रातील योगदाना बद्दल हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.

 

त्यांच्या मुझे जीना नही आताया अनुवादित नज्मचे २०१० च्या प्रजासत्ताक दिनी आयोजित कवी सम्मेलनात सर्व भाषेमध्ये औरंगाबाद आकाशवाणी वरून प्रसारण करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उर्दूचे मार्गदर्शक प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले.

 

पुरोगामी विचारसरणी स्वीकारल्यामुळे परंपरावादी लेखकांचा विरोधही त्यांनी सहन केला. तरुणपणी सोशालिस्ट पार्टीचे नगरसेवकपद त्यांनी तीन वेळेस भूषवले. औरंगाबाद शहरातील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक चळवळीत बशर नवाज यांचे विशेष योगदान होते.

 

करोगे याद तो, हर बात याद आयेगी

गुजरते वक्त की, हर मौज ठहरजायेगी

करोगे याद तो...

 

ये चाँद बीते जमानो का आईना होगा

भटकते अब्र में, चेहरा कोई बना होगा

उदास राह कोई दास्तां सुनाएगी

करोगे याद तो...

 

बरसता भीगता मौसम धुआँ धुआँ होगा

पिघलती शम्मो पे दिल का मेरे गुमा होगा

हथेलियों की हिना, याद कुछ दिलायेगी

करोगे याद तो...

 

गली के मोड़ पे, सूना सा कोई दरवाजा

तरसती आँखों से रस्ता किसी का देखेगा

निगाह दूर तलक जा के लौट आयेगी

करोगे याद तो...

 

चित्रपट : बाजार

संगीतकार : खय्याम

गीतकार : बशर नवाज

गायक : भुपेंद्र

 

अशा त्यांच्या अनेक रचना विशेष लोकप्रिय झाल्या होत्या.

 

बशर नवाज यांचे ९ जुलै २०१५ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१८ ऑगस्ट

विजयालक्ष्मी पंडीत जन्मदिन

************

 

जन्म - १८ ऑगस्ट १९०० (अलाहाबाद)

स्मृती - १ डिसेंबर १९९० (देहरादून)

 

विजयालक्ष्मी पंडित या मोतीलाल नेहरू यांच्या कन्या व जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी होत्या.

 

१८ ऑगस्ट १९०० साली विजयालक्ष्मी यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव स्वरूपराणी व वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू असे होते. त्यांना एक बहीण व एक भाऊ होता. भावाचे नाव जवाहरलाल नेहरू व बहिणीचे कृष्णा नेहरू (हाथीसिंग) असे होते. स्वरूपराणींचा स्वभाव आज्ञाधारक व अतिशय सौम्य असा होता. त्या स्वाभिमानी आणि उत्साही होत्या.

 

पहिली पाच वर्षे विजयालक्ष्मी यांच्या वडिलांनी घरीच एक इंग्रज शासिका नेमलेल्या होत्या. त्या कडक शिस्तीच्या होत्या. त्या पाच वर्षांच्या असताना त्या इंग्लंड येथे गेल्या तेथेही त्यांना शिकवण्यास शासिका नेमल्या, त्यांचे नाव कुअसे होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच अध्यापिकांद्वारे झाले. नंतर त्या शिक्षणासाठी स्वित्झर्लंड येथे गेल्या.

 

अलाहाबादमधील आनंद भवन हे मोतीलाल नेहरूंनी विकत घेतलेले घर होते. सन १९१९ साली ज्यावेळी महात्मा गांंधी तिथे येऊन राहिले तेव्हा त्या घरातच राहणाऱ्या विजयालक्ष्मी पंडित अतिशय भारावून गेल्या. पुढे त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर प्रत्येक आंदोलनात त्यांनी भाग घेतला. एका आंदोलनातुन सुटका झाल्यावर परत दुसऱ्या आंदोलनात भाग, असे अनेकदा झाले.

 

विजयालक्ष्मी यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यांचा भाऊ व त्यांचे वडील राजकारणातच होते. तेथे स्वरूपकुमारी यांची भेट काठेवाडचे मराठी भाषक बॅरिस्टर आणि विख्यात संस्कृत विद्वान रणजित सीताराम पंडित यांच्याशी झाली. ते अतिशय कुशाग्र बुद्धीचे होते. त्यांनी काश्मिरी लेखक कल्हण याच्या 'राजतरंगिणी' या संस्कृत ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर केले होते.

 

रणजित पंडित आणि स्वरूपकुमारी यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि १० मे १९२१ साली स्वरूप व रणजित पंडित यांचा विवाह झाला. त्यानंतर त्या विजयालक्ष्मी पंडितझाल्या. असहकाराच्या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल लखनौच्या तुरुंगात टाकलेल्या रणजित पंडित यांचे तुरुंगातच निधन झाले.

 

विजयालक्ष्मी पंडित या संसदपटू व उत्तम वक्त्या म्हणून प्रसिद्ध आहेत. २१ विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविले. त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून १९६२ ते १९६४ पर्यंत काम केले. १९५३ मध्ये त्या संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. १९६४ मध्ये त्या फूलपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आल्या.

 

विजयालक्ष्मी पंडित या इंग्लंड, रशिया आणि माॅस्को येथे वेगवेगळ्या वेळी भारताच्या राजदूत होत्या.

 

विजयालक्ष्मी पंडित यांचा मृत्यू १ डिसेंबर १९९० रोजी झाला.

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

१८ ऑगस्ट

अभिनेत्री पर्सिस खंबाटा स्मृतिदिन

************

 

जन्म - २ ऑक्टोबर १९४८ (मुंबई)

स्मृती - १८ ऑगस्ट १९९८

 

एखाद्या गोष्टीबद्दल केलेले प्रामाणिक प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. त्यातलीच एक पर्सिस खंबाटा.एक उत्तम भारतीय मॉडेल, अभिनेत्री आणि लेखिका. तिचा जन्म २ ऑक्टोबर १९४८ साली झाला. १९७९ च्या तिच्या स्टार ट्रेक : द मोशन पिक्चरमधील बाल्ड डेल्टन नेव्हिगेटर लेफ्टनंट इलियानावाची भूमिका सर्वाधिक गाजली होती.

 

पर्सिस खंबाटाचा जन्म मुंबईमध्ये एका मध्यमवर्गीय पारशी कुटुंबात झाला. ती अवघी दोन वर्षांची असतानाच तिचे वडील कुटुंबीयांना सोडून गेले. मुंबईमध्ये एका प्रसिद्ध छायाचित्रकाराने तिच्या फोटोंचा संच एका साबणाच्या जाहिरातीसाठी वापरला आणि त्या क्षणाने तिच्या जीवनाला कलाटणी मिळाली.

 

पर्सिस वयाच्या १७ व्या वर्षी फेमिना मिस इंडियाची स्पर्धा ज

************

१८ ऑगस्ट

हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक स्मृतिदिन

************

 

जन्म - १ जुलै १९१३ (यवतमाळ)

स्मृती - १८ ऑगस्ट १९७९

 

हरितक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांचा जन्मदिन 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा करण्यात येतो.

 

हरितक्रांतीचे शिल्पकार व बंजारा समाजाला आधुनिक जगाची ओळख करुन देणाऱ्या तसेच सतत अकरा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यपमंत्री पद भूषविलेले मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व एक कृषितज्ञ. त्यांचा जन्म विदर्भातील गहुली (जिल्हा यवतमाळ) येथे सधन शेतकरी कुटुंबात झाला. नाईकांचे मूळ आडनाव राठोड; पण गहुली हे खेडे वसंतराव नाईक यांचे आजोबा चतुरसिंग राठोड यांनी वसविले. त्यांनी जमीनजुमला जमा करून आपल्या समाजाला स्थिर जीवन प्राप्त करून दिले. साहजिकच ते वंजारी समाजाचा नाईक म्हणजे पुढारी झाले. त्यावरून पुढे नाईक हे आडनाव रूढ झाले.

 

चतुरसिंग यांचा फुलसिंग हा मुलगा पुढे या समाजाचा नाईक झाला. त्याच्या होनूबाई या पत्नीला दोन मुलगे झाले. राजूसिंग व हाजूसिंग. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले. वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण विविध खेड्यांत झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून १९३८ साली बी.ए. ही पदवी घेतली व नंतर एल्.एल्.बी ही पदवीही मिळविली.

 

विद्यार्थिदशेत त्यांच्यावर महात्मा जोतिबा फुले व डेल कार्नेगी या दोहोंच्या विचारांची छाप पडली. तसेच महाविद्यालयात असताना त्यांचा स्नेह नागपूर मधील घाटे या प्रसिद्ध ब्राह्मण कुटुंबाशी जडला. या स्नेहाची परिणती वसंतराव व वत्सलाबाई यांच्या आंतरजातीय प्रेमविवाहात झाली. या विवाहामुळे विदर्भात थोडी खळबळ उडाली व उभयतांना काही वर्षे आपापल्या घरांपासून अलिप्त राहणे अपरिहार्य झाले; पण वसंतरावांनी पूर्ण विचारान्ती हे लग्न केले होते. त्यांची वकिलीही ठीक चालली होती. वत्सलाबाई बी.ए. असून वसंतरावांच्या बरोबरीने समाजकार्यात सहभागी असत. वसंतरावांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. हळूहळू त्यांचा वकिलीत जम बसू लागला व आर्थिक स्थितीही सुधारली तसेच प्रतिष्ठाही वाढली.

 

ते १९४३ ते १९४७ पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. या शिवाय हरिजन वसतिगृह व राष्ट्रीय वसतिगृहाचे (डिग्रस) ते अध्यक्ष होते. १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मध्य प्रदेश राज्याच्या मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती झाली. ते १९४६ ते १९५२ पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष होते. पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले.

 

१९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले. पुढे १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यू नंतर १९६३ साली ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या पदावर त्यांनी १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.

 

प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईनअसे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन व्यावहारिक असे.

 

काँग्रेसचे दारूबंदी हे धोरण असताना सुद्धा त्यांनी महाराष्ट्रात दारूबंदी शिथिल करून लोकांना चांगली दारू उपलब्ध केली व हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडे जाते. २० फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य केले. १९७७ मार्चमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून आले.

 

वसंतराव नाईक यांचे १८ ऑगस्ट १९७९ रोजी निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१८ ऑगस्ट

अभिनेत्री प्रोतिमा बेदी स्मृतिदिन

************

 

जन्म - १२ ऑक्टोबर १९४८ (दिल्ली)

स्मृती - १८ ऑगस्ट १९९८

 

बॉलीवूड मधील वाद्ग्रस्त अभिनेत्री प्रोतिमा बेदी यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९४८ दिल्ली येथे झाला.

 

प्रोतिमा बेदी यांचे वडील लक्ष्मीचंद गुप्ता व्यापारी होते. प्रोतिमा बेदी या फारच बोल्ड होत्या. कबीर बेदी यांच्या बरोबर प्रेम जमले तेव्हा त्याकाळी त्या कबीर बेदी यांच्या बरोबर सुरुवातीला लिव-इन रिलेशनशिप मध्ये राहत होत्या. तेव्हा त्या १९ वर्षाच्या होत्या. त्याच दरम्यान लग्नाआधीच प्रोतिमा प्रेग्नंन्ट राहिल्या होत्या. पुढे त्यांनी लग्न केले. पूजा बेदी ही त्यांची मुलगी होय.

 

अशा वादग्रस्त प्रोतिमा यांचं व्यावसायिक जीवनही तितकंच वादळी होतं. मॉडेल असणाऱ्या प्रोतिमा यांनी एका मासिकासाठी बीचवर चक्क नग्न फोटोशूट केलं होतं. त्यावेळी त्यांची लेक पूजा बेदी ४ वर्षांची होती. 'सिनेब्लिट्झ' या मासिकासाठी प्रोतिमा नग्न होऊन बीचवर धावल्या होत्या. १९७४ साली हे मासिक लाँच होणार होते. तेव्हा मासिकाच्या प्रमोशनसाठी मासिकाचे प्रमुख करंजिया यांनी प्रोतिमांना असे करण्यास सांगितले होते.

 

मासिकाला हिट करण्यासाठी सिनेब्लिट्झची टीम विवस्र होऊन बीचवर धावणाऱ्या मॉडेलच्या शोधात होती. मात्र त्यासाठी त्या काळात कोणतीही मॉडेल हे करण्यास धजावणार नव्हती.'सिनेब्लिट्झ' मासिकाच्या संपादिका रुसी यांनी प्रोतिमा यांचे नाव पुढे केले. प्रोतिमा यांना याबद्दल विचारले असता त्यांनीही ते मान्य केले होते.

 

त्या एक ओडिसी नृत्यांगना होत्या. लग्ना नंतर त्या ओडिसी नृत्य शिकल्या. पुढे प्रोतिमा बेदी यांना प्रसिद्ध ओडिसी नृत्यांगना म्हणून ओळखले जाऊ लागले. बंगलोर जवळ त्यांनी डान्स गाव नृत्यग्राम बनवले. त्यांच्या मुलाने आत्महत्या केल्याने  प्रोतिमा बेदी या अध्यात्माकडे वळल्या व हिमालयात निघून गेल्या.

 

१८ ऑगस्ट १९९८ रोजी एका रस्ता अपघातात प्रोतिमा बेदी यांचे निधन झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१८ ऑगस्ट

नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृतिदिन

************

 

जन्म - २३ जानेवारी १८९७

मृत्यू - १८ ऑगस्ट १९४५

 

आज नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी झाला.

 

नेताजी सुभाषचंद्र बोस हे इतके महान व्यक्तिमत्व आहे की, "भारताला स्वातंत्र्य कशामुळे नि कुणामुळे मिळाले?" या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेतल्यास सर्वात पहिले नाव जर कुणाचे येईल तर ते नेताजींचेच.

 

"हम सब मिलकर आगे बढेंगे, तो सिध्दी प्राप्त होगी ही| हम अपनी दृष्टी को जितनी अधिक ऊपर की तरफ उठायेंगे, उतना ही हम भुतकाल के कटु अनुभवोंको भुलते जायेंगे और तब भविष्यकाल पूर्ण प्रकाशयुक्त रुप में हमारे सामने प्रकट होगा।"

 

नेताजी सुभाषचंद्र बोस हे स्वामी विवेकानंदांच्या विचारसरणीने खुप प्रभावित झाले होते. त्यांच्यावर क्रांतिकारकांचाही खुप प्रभाव होता. आपल्या सुरुवातीच्या राजकीय जीवनात ते गांधीजी बरोबर होते, पण गांधीजींच्या कायदेभंगाला त्यांचा जरी पाठींबा होता तरीही अहिंसात्मक मार्गाने स्वातंत्र्य मिळेल यावर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांच्या मते, 'इतिहासात चर्चेतुन कुठलाही फारसा मोठा फरक झालेला नाही. स्वातंत्र्य दिले जात नाही तर ते घेतले जाते. त्याच्यासाठी किंमत द्यावी लागते. आणि ती किंमत म्हणजे रक्त!'

 

पण गांधीजी बद्दल सुभाषबाबुंच्या मनात प्रचंड आदरही होता. गांधीजींशी मतभेद झाल्यानंतरही बर्लिनमधुन त्यांनी दिलेल्या भाषणात त्यांनी गांधीजींना 'राष्ट्रपिता' ही उपाधी दिली. गांधीजींना काँग्रेसमधे असताना एकदा सुभाषबाबुंनी ब्रिटीशां विरुध्द राष्ट्रव्यापी चळवळ उभी करण्याची विनंती केली. हिंसाचार होईल असे गांधीजींना वाटल्याने त्यांनी त्यास नकार दिला. काही लोकांनी सुभाषबाबुंना म्हटले की, 'तुम्हीच अशी चळवळ उभी का करत नाही?' तर सुभाषबाबु म्हणाले की, 'मी जर बोलावलं तर २० लाख लोक सहभागी होतील आणि गांधीजींनी बोलावलं तर २० कोटी लोक सहभागी होतील!'

 

गांधीजींची असलेली लोकप्रियता सुभाषबाबुंना माहित होती. ते एकदा म्हणाले होते की, 'गांधीजींची सामान्य जनतेत जितकी लोकप्रियता आहे तितकी जगातल्या इतर कुणाला मिळाली असेल असे मला वाटत नाही'. गांधीजींच्या उदाहरणावरुन आणि इतर अभ्यासातुन नेत्याची जनतेत असलेली प्रतिमा जनतेला कार्य करण्यास उद्युक्त करण्यास सर्वात महत्वाची असते, असे सुभाषबाबुंचे मत झाले असावे असे वाटते.

 

फॉरवर्ड ब्लॉकला भरपुर प्रसिध्दी देण्यासाठी १० महीन्यात सुभाषबाबुंनी १००० सभा पुर्ण देशभरात घेतल्या होत्या. त्यानंतरच्या जर्मनी आणि जपान मधील त्यांच्या वास्तव्यातही त्यांनी यावर भर दिला. त्यांचे वाढदिवस एखाद्या सणासारखे साजरे केले जात असत.

 

आपल्या सैन्याला आपल्यावर पुर्ण विश्वास असावा यासाठी ते काळजी घेत. सिंगापुर मध्ये जुलै १९४३ साली दिलेल्या एका भाषणात त्यांनी म्हटले होते की, "मी हिंदुस्तानाशीच एकनिष्ठ राहिल. मी माझ्या मातृभुमिशी कधीच गद्दारी करणार नाही. मी मातृभुमिसाठीच जगेल नि तिच्यासाठीच मरेल. मला शिक्षा आणि शारीरीक त्रास देउनही ब्रिटीश मला थांबवु शकले नाहीत. ब्रिटीश मला फितवुही शकत नाहीत आणि मला फसवुही शकत नाहीत."

 

नेताजींना त्यांच्या आयुष्यात ११ वेळा अटक झाली होती. त्यांचा भारतीय तत्वज्ञानाचा गाढा अभ्यास होता. त्याचबरोबर त्यांनी पाश्चिमात्य विचारांचाही अभ्यास केला होता. त्यांची राजकीय विचारसरणी ही फॅसिझम आणि कम्युनिझम यांचे मिश्रणाची होती, ज्यास त्यांनी 'साम्यवाद' हे नाव दिले होते.

 

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर काही वर्षे तरी authoritarian rule असला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. व्यक्तिपेक्षा राष्ट्र महत्वाचे आहे, निस्सीम राष्ट्रवाद अत्यावश्यक आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते. जरीही फॅसिझमला काही अंशी त्यांचा पाठींबा होता तरीही नाझी आक्रमकता आणि वंशवादास त्यांचा विरोध होता.

 

नेताजीं व सावरकर यांची भेट झाल्यावर सावरकरांनी त्यांना, 'ब्रिटीश अधिकार्यां चे पुतळे उखडुन वगैरे क्षुल्लक चळवळी करुन ब्रिटीशांना तुम्ही अटक करण्याची आयतीच संधी देत आहात. त्यापेक्षा दुसर्या महायुध्दातील भारतीय युध्दकैद्यांची व ब्रिटीशांच्या शत्रूंची मदत घेउन तुम्ही ब्रिटीशांना देशातुन हाकलुन द्यावे. माझ्या नजरेसमोर असे करु शकणारे जे २-३ भारतीय नेते आहेत त्यापैकी एक तुम्ही आहात.' असे सांगितले. यावर सुभाषबाबुंनी नक्कीच विचार करुन ब्रिटीशांच्या तावडीतुन आपली सुटका करुन नंतर जर्मनी व जपानकडुन मदत मिळवली.

 

सावरकर हे भारतातील 'द्रष्टे नेते' आहेत हे नंतर त्यांनी म्हटले. त्याचबरोबर अंदमानात ब्रिटीशांचा पराभव केल्यावर त्यांनी सेल्युलर जेलला भेट दिली व सावरकरांच्या '१८५७ चे स्वातंत्र्यसमर्' या पुस्तकाच्या हजारो प्रती छापुन त्या भारतीयां मध्ये वाटल्या.

 

आपल्या देशासाठी रक्त द्या असे सांगताना नेताजी म्हणतात, "इस रास्तेपर हमें अपना खुन बहाना है| हमै कुर्बानी खाना है| सब मुश्किलों का सामना करना है। आखिरमें कामयाबी मिलेगी| इस रास्तेमें हम क्या देंगे? हमारे हातमें है क्या? हमारे रास्ते में आयेगी भुक, प्यास, तक्लिफें, मुसिबतें, मौत। कोई नहीं कह सकता है जिन लोग इस जंग मै शरीक होंगे, उनमेंसे कितने लोग निकलेंगे जिंदा रहकर। कोई बात नहीं है, हम जिंदा रहेंगे या फिर मरेंगे, कोई बात नही है। सही बात यह है की, आखिर में हमारी कामयाबी होगी, हिंदुस्तान आझाद होगा।"

 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन १८ ऑगस्ट १९४५ रोजी झाले.

 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आदरांजली !

 

संजीव वेलणकर, पुणे

९३२२४०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१८ ऑगस्ट

विज्ञान लेखक नारायण गोपाळ धारप स्मृतिदिन

************

 

जन्म - २७ ऑगस्ट १९२५ (पुणे)

स्मृती - १८ ऑगस्ट २००८ (पुणे)

 

नारायण गोपाळ धारप यांचा जन्म पुण्यात झाला. रसायनशास्त्रात त्यांनी मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी. पदवी मिळवली. यानंतर त्यांनी रसायन तंत्रज्ञानात बी.एस्सी. (टेक) केले. मग त्यांनी भारतात आणि आफ्रिकेत नोकऱ्या केल्या. आफ्रिकेतून परत आल्यावर त्यांनी नागपूर येथे व्यवसाय सुरू केला; पण त्यात त्यांना अपेक्षित असे यश मिळाले नाही. मग नागपूरचा गाशा गुंडाळून ते पुण्याला आले. पुण्यात शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि बदली होऊन आलेल्या नोकरदारांना त्यांनी तात्पुरत्या निवासासाठी लागणाऱ्या पलंग, टेबल, कच्च्या, काटे यांसारख्या गोष्टी भाड्याने देण्याच्या सामानाचे दुकान सुरू केले आणि हा व्यवसाय त्यांनी अखेरपर्यंत केला.

 

व्यवसाय म्हणून नोकरी करणे किंवा दुकान चालवणे या गोष्टी धारपांनी पोटासाठी केल्या; पण त्यांची खरी आवड होती लिखाणाची. नागपूरला असतानाच त्यांनी विज्ञानकथा लिहायला सुरुवात केली. ही गोष्ट १९५० सालाच्या दरम्यानची. त्या वेळी विज्ञानकथा म्हणजे काय हे लोकांना माहीत नव्हते; कारण मुळात विज्ञानावरच फारसे लिखाण त्या वेळी प्रसिद्ध होत नसे. विज्ञान फारसे अवगत नसल्याने त्यावर आधारित कथांना वाचक मिळणे दुरापास्त होते.

 

धारपांनी आयुष्यात एकूण १५ विज्ञान कादंबऱ्या, तीन विज्ञानकथा संग्रह आणि पाच सामाजिक कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या. विज्ञान साहित्याला आणि सामाजिक कादंबऱ्यांना वाचकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही हे पाहून धारप भयकथा आणि गूढकथा कडे वळले आणि हा बाज धारपांच्या स्वभावाला जुळला आणि वाचकांनाही आवडला. यामुळे लेखक आणि वाचक अशी एक तार जुळून आली.

 

गूढ कादंबऱ्या आणि कथासंग्रह मिळून धारपांनी पुस्तकांची शंभरी गाठली. चंद्रविलास, नवे दैवत, मृत्युद्वार, पारंब्यांचे जग, साठे फायकस, फायकसची अखेर, ऐसी रत्ने मेळवीन, कपटी कलंदर अशी त्यांच्या लोकप्रिय कादंबऱ्यांची नावे आहेत. जयदेव, कृष्णचंद्र, चक्रवर्ती चेतन, अशोक समर्थ अशी त्यांच्या या रहस्यकथांतील नायकांची नावे आहेत.

 

धारपांनी दरमहा एक, अशा रहस्यकथा लिहायचा प्रयत्न केला; पण तो त्यांना मानवला नाही आणि तो प्रयोग त्यांनी थांबवला. धारपांच्या बहुतेक विज्ञान कथा या परदेशी विज्ञानकथा वर आधारित अशा बेतलेल्या असत. पर्रहावरील आयुष्य हा त्यांचा एक आवडता विषय होता. धारपांनी वनस्पती विचार करू शकतात, त्या बुद्धिमान असतात, या विषयावर तीन कादंबऱ्या लिहिल्या आहेत.

 

धारप १९५० सालापासून लिहीत होते. त्या वेळी मराठी विज्ञान कथा लिहिणारे कोणी नव्हते. धारप खऱ्या अर्थाने गूढ आणि भयकथांत स्थिरावले. त्यामुळे धारप लिहीत असलेल्या भय आणि गूढकथा म्हणजेच विज्ञानकथा, असा वाचकांचा समज फार वर्षे होता, तो १९७०च्या दशकात अस्सल विज्ञानकथा छापून येईपर्यंत. धारप यांचे निधन पुण्यात वयाच्या ८३व्या वर्षी झाले.

 

~ प्रा. निरंजन घाटे / अ.पां. देशपांडे ~

 

https:/www.facebook.com/दिनविशेष-आणि-विज्ञान-501443670043532/

 

************

************

१८ ऑगस्ट

अभिनेत्री अरुणा इराणी यांचा वाढदिवस

************

 

जन्म - १८ ऑगस्ट १९४६ (मुंबई)

 

जेष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांचा आज वाढदिवस.

 

साठ च्या दशकात 'गंगा जमुना' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणाऱ्या अरुणा इराणी यांनी तीनशेहून अधिक सिनेमा मध्ये अभिनय केला आहे. १९६१ मध्ये 'गंगा जमुना' या सिनेमात काम करणाऱ्या अरुणा यांचे त्यावेळी वय केवळ नऊ वर्षे होते.

 

जहां आरा, फर्ज, उपकार, आया सावन झूम के, कारवां; यांसारख्या हिट सिनेमा मध्ये अरुणा इराणी यांनी काम केले. 'कारवां' या सिनेमातील अरुणा इराणी यांच्या कामाचे विशेष कौतुक झाले. या सिनेमातील 'चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी' आणि 'दिलबर दिल से प्यारे' ही गाणी अरुणाच्या डान्समुळे लोकप्रिय झाली.

 

१९७२ मध्ये अरुणा यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह 'बॉम्बे टू गोवा' या सिनेमात स्क्रिन शेअर केली. या सिनेमात महमूद सुद्धा होते. अरुणा यांचे नाव त्याकाळी महमूद यांच्या सोबत जुळले होते. त्यांनी महमूद यांच्यासह औलाद, हमजोली, नया जमाना, गरम मसाला, दो फूल; या सिनेमा मध्ये काम केले.

 

थोड़ा रेशम लगता है, चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी, दिलबर दिल से प्यारे, मैं शायर तो नही; हे ही सुपरहिट गाणी आहेत, ती अरुणा इराणी यांच्या डान्स मुळे आणखीनच प्रसिद्ध झाली. अरुणा यांनी इंडस्ट्रीत येणाऱ्या नवोदित अभिनेता अभिनेत्रींना खूप मदत केली.

 

हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या काही कलाकारांच्या बाबतीत अरुणा इराणी खूप लकीठरल्या आहेत. ज्यांनी आपल्या पदार्पणातील चित्रपटात अरुणा इराणी यांच्या सोबत काम केले ते पुढे स्टारझाले आहेत. जीतेंद्र (फर्ज), ऋषी कपूर व डिम्पल कपाडिया (बॉबी), शबाना आझमी (फकिरा), जयाप्रदा (सरगम), कुमार गौरव (लव्हस्टोरी), संजय दत्त (रॉकी) या सर्व चित्रपटात अरुणा इराणी यांनी काम केले होते.

 

त्यांनी 'फर्ज' मध्ये जितेंद्र, 'बॉबी' मध्ये ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया, 'सरगम' मध्ये जयाप्रदा, 'लवस्टोरी' मध्ये कुमार गौरव आणि 'रॉकी' मध्ये संजय दत्तची बरीच मदत केली. मात्र हे सर्व सुपरस्टार बनले आणि दुर्दैवाने अरुणा इराणी या सहायक अभिनेत्रीच राहिल्या.

 

'पेट प्यार और पाप' आणि 'बेटा' या सिनेमातील उत्कृष्ट अभिनयासाठी अरुणा यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहायक अभिनत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

 

आपल्या करिअर मध्ये अरुणा यांनी मराठी सिनेमा मध्येही अभिनय केला. शिवाय छोट्या पडद्यावरही त्यांचे दर्शन घडले. १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या चंगूमंगूमध्ये अरुणा इराणी यांनी काम केले होते. २००० साली 'जमाना बदल गया' या मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले.

 

अरुणा इराणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१८ ऑगस्ट

गायक दलेर मेहंदी यांचा वाढदिवस

************

 

जन्म - १८ ऑगस्ट १९६७ (पटना)

 

'भांगडा किंग' म्हणून ओळखले जाणारे पार्श्वगायक दलेर मेहंदी यांचा आज वाढदिवस.

 

दलेर मेहंदी यांना संगीत कुटुंबाच्या परंपरेतूनच मिळाले. मिकासिंग हा दलेर मेहंदी यांचा भाऊ. दलेर व मिका ही घराण्यातील गायक असणारी सातवी पिढी आहे. घरात संगीतमय वातावरण असल्याने, दलेर यांना लहानपणापासून संगीत आवडू लागले होते. त्यांचे वडील सरदार अदमेर सिंह पटनासाहिब येथील तख्त श्री हरमिंदर साहिब येथे भजन व शबद गायनाचे काम करीत असत. त्यांनी दलेर मेहंदी यांना लहानपणापासूनच राग आणि सबद याविषयी शिक्षण देणे सुरु केले.

 

पटना शहरातील संगीत सदन आणि मुकुट संगीत विद्यालयातून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर, ११ वर्षांचे असतांना गाणे शिकण्यासाठी दलेर घर सोडून गोरखपूर येथे उस्ताद राहत अली खान यांच्याकडे गेले आणि त्यानंतर दोनच वर्षांनी म्हणजे १३ वर्षांचे असतांनाच जौनपूर येथे २० हजार लोकांसमोर आपला पहिला स्टेज परफॉर्मन्स केला. दरम्यान काही काळ त्यांनी पटना शहरातील श्री हरमिंदर साहिब येथे शबद कीर्तनही गायले. बाहेर कार्यक्रम करताना सुरुवातीला दलेर मेहंदी यांचे मानधन होते प्रत्येक गाण्याला एक रुपया. स्थानिक कार्यक्रमांतून दलेर यांचे गाणे गाजत असताना मॅग्नासाऊंड कंपनीने दलेर यांना ३ वर्ष व ३ अल्बम करिता साइन केले.

 

यातील पहिला अल्बम बोलो ता रा राहा सुपरहिट झाला. या अल्बमची २० लाख विक्री झाली. या अल्बममुळे दलेर मेहंदी एक पॉपस्टार म्हणून जगाला माहित झाले. या अल्बमकरिता त्यांना चॅनल व्हीचे सर्वश्रेष्ठ पुरुष पॉप कलाकाराचे पारितोषिकही मिळाले.

 

यानंतर दलेर यांचा दुसरा अल्बम आला मै डरदी रब रब करदीया अल्बमने तर आधीचे सर्वच रेकॉर्ड तोडले. चॅनल व्ही च्या पुरस्कारात दलेर मेहंदी यांना तीन वेगवेगळ्या विभागाकरिता नामांकन मिळाले. यातील सर्वोत्कृष्ठ भारतीय पॉपस्टारचा पुरस्कार दुसर्यांदा त्यांना मिळाला.

 

१९९७ मध्ये तिसरा अल्बम बल्ले बल्लेआला. या अल्बमला चैनल व्हीच्या सहा संगीत विभागातील पारितोषिके मिळाली. यादरम्यान मिळालेल्या प्रसिध्दीने दलेर मेहंदी यांना हिंदी चित्रपटसृष्टीची दारे खुली झाली.

 

मृत्यूदाता चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत ना ना ना रेह्या गाण्यात दलेर यांना काम करण्याची संधी मिळाली. यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

 

दलेर यांनी दोन लग्ने केली. त्यातले पहिले लग्न अमरजीत मेहंदी यांच्याशी. त्यांची मुले मंदीप मेहंदी आणि मुलगी अजित मेहंदी दोघेही पार्श्वगायन क्षेत्रात कार्यरत आहेत. दुसरे लग्न आर्किटेक्ट आणि गायक तरनप्रीत यांच्याशी झाले. तरनप्रीत यांना निक्की मेहंदी या नावाने गायन क्षेत्रात ओळखले जाते.

 

दलेर यांचे नाव दलेर असण्यामागे देखील एक किस्सा आहे. त्याकाळात प्रसिध्द असलेल्या डाकू दलेरसिंह यांच्या नावाचा दबदबा होता. त्याच्या नावावरून त्यांचे नाव दलेर सिंह ठेवण्यात आले. काही काळानंतर प्रसिध्द गायक परवेज मेहंदी यांच्या नावातून मेहंदी हा शब्द दलेरसिंह यांच्यापुढे लागून दलेर मेहंदी असे नाव झाले.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१८ ऑगस्ट

गीतकार गुलजार यांचा वाढदिवस

************

 

जन्म - १८ ऑगस्ट १९३४ (पाकिस्तान)

 

गुलज़ार यांचे खरे नाव संपूर्णसिंह कालरा आहे. भारतातील एक कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अश्या बहुमुखी प्रतिभेचे धनी गुलज़ार यांचा जन्म १८ ऑगस्ट १९३६ रोजी पंजाब मधील दीना येथे झाला. हे ठिकाण सध्या पाकिस्तानात आहे.

 

गुलजार यांना लहानपणापासून गीतांच्या भेंड्या मध्ये भाग घ्यायला आवडत असे. त्यावरून त्यांना पुढे कविता व नंतर उत्तर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात रस वाटू लागला. ते शेजाऱ्यांकडे जाऊन तंतुवाद्य वाजविण्याचा अभ्यास करीत. गुलजार जेव्हा महाविद्यालयात गेले तेव्हा ते नियमितपणे रविशंकर आणि अली अकबर खान यांच्यासारख्यांच्या वाद्यसंगीताच्या कार्यक्रमांना जाऊ लागले.

 

हिंदुस्तानची फाळणी झाल्यानंतर गुलजार यांचे कुटुंब फार वर्षे पाकिस्तानात राहू शकले नाही. ती मंडळी भारतात अमृतसरला आली आणि गुलजार मुंबईला. इथे ते एका मोटार गॅरेज मध्ये काम करू लागले. मुंबईत त्यांना हिंदी चित्रपटांचे आकर्षण वाटू लागले. फावल्या वेळात ते कविता करत. बिमल रॉय, हृषीकेश मुखर्जी आणि हेमंत कुमार यांना भेटून ते आपल्या कविता वाचून दाखवू लागले. परिणामी बंदिनी चित्रपटासाठी गुलजार यांनी मोरा अंग अंग लै ले, मुझे श्यामरंग दै देहे गाणे लिहिले आणि ते बिमल रॉय यांचे पूर्णवेळचे असिस्टंट झाले. ते गाणे अतिशय लोकप्रिय झाले आणि गुलजार यांना जिकडे तिकडे गीतलेखनासाठी बोलावणी येऊ लागली.

 

नंतरच्या काळात गुलजार यांनी हृषीकेश मुखर्जी, असित सेन यांच्या चित्रपटांसाठीही गीते लिहिली.

 

गुलज़ार हे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विशिष्ट शब्दशैलीसाठी ओळखले जातात. ज्या सामान्यतः गीतांमध्ये वापरल्या जात नाहीत, अश्या प्रतिमा गुलज़ार यांच्या गीतांमध्ये ठिकठिकाणी वापरलेल्या आढळतात.

 

उदाहरण म्हणून काही गीते :

 

'सत्या' चित्रपटील अतिशय लोकप्रिय गीत 'सपने में मिलती हैं' हे गीत नावीन्यपूर्ण प्रतिमा वापरून अगदी हृदयंगम झाले आहे. 'सारा दिन सडकों पे खाली रिक्षे सा पीछे पीछे फिरता हैं।'

 

बंटी और बबली मधील, ऑंखें भी कमाल करती हैं पर्सनल से सवाल करती हैं।

 

गुलज़ार यांचे प्रत्येक गीत अशा प्रतिमांनी पुरेपूर असते. ओंकारा मधील, 'बीडी आणि नमक इश्क़ का'.

 

गुलज़ार यांनी पुढील चित्रपटांसाठी गीते लिहिली - आनंद, ओंकारा, खामोशी, गुड्डी, जान-ए-मन, थोडीसी बेवफाई, दो दूनी चार, नमकहराम, बंटी और बबली, बावर्ची, सफर.

 

गुलजार यांनी निर्माण केलेले चित्रपट - अंगूर, अचानक, ऑंधी, किनारा, कोशिश, खुशबू, नमकीन, परिचय, मीरा, मेरे अपने, मौसम, लेकिन.

 

 

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

 

संदर्भ : विकिपीडिया

 

************

************

१८ ऑगस्ट

गायिका सावनी शेंडे चा वाढदिवस

************

 

जन्म - १८ ऑगस्ट १९७९

 

गायिका सावनी शेंडेचा आज वाढदिवस.

 

सावनी शेंडेला स्वरांचा वारसा घरातूनच मिळाला आहे. आजी कुसुम शेंडे आणि वडील डॉ. संजीव शेंडे यांच्या रूपाने गाण्याची शाळाच सावनीच्या घरी होती. कुसुम शेंडे या किराणा घराण्याच्या गायिका; तसेच संगीत नाटकाच्या पिढीतील उत्तम कलाकार होत्या. वडील डॉ. संजीव शेंडे यांनाही शोभा गुर्टू यांचे मार्गदर्शन लाभले. दादरा, ठुमरी अशा उपशास्त्रीय गायनात त्यांचा हातखंडा आहे.

 

लहानपणी आजीचा आणि वडिलांचा रियाज कानावर पडल्याने हळूहळू तिचा कान गाण्यासाठी तयार होऊ लागला. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षीच प्रेक्षकांसमोर गाण्याची संधी त्यांना मिळाली. लहानपणीच सावनीची क्षमता उमगल्यामुळे तिचे शास्त्रोक्त शिक्षण सुरू झाले. त्यानंतर बाराव्या वर्षी तिला राष्ट्रपती समोर गाण्याची संधी मिळाली.

 

सावनीने आजीकडून किराणा घराण्याचे, तर डॉ. वीणा सहस्रबुद्धे यांच्याकडून ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आहे. ग्वाल्हेर, अहमदाबाद, मुंबई, कोलकता, बंगळुरू यांसह देशभरात विविध ठिकाणी तिचे गाण्याचे कार्यक्रम केले आहेत.

 

सावनीने 'कैरी' या मराठी चित्रपटासाठी पार्श्व गायन केले आहे. 'सावली' चित्रपटासाठी सावनी यांना पुरस्कार देखील मिळाला आहे. पं.जसराज गौरव पुरस्कार, माणिक वर्मा मेमोरिअल पुरस्कार अशा पुरस्कारांच्या सावनी मानकरी आहे.

 

'झाले मोकळे आकाश' या मालिकेचे शीर्षकगीत सावनी हिने गायले आहे. त्यासाठी तिला 'रापा इंटरनॅशनल पुरस्कार' मिळाला आहे. 'हृदय स्वर' हे सावनीचे एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. या पुस्तकात तिने स्वतः रचलेल्या काही बंदिशी आहेत.

 

सावनी शेंडेला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१८ ऑगस्ट

अभिनेत्री प्रीती झंगियानी चा वाढदिवस

************

 

जन्म - १८ ऑगस्ट १९८० (मुंबई)

 

अभिनेत्री प्रीती झंगियानीचा आज वाढदिवस.

 

आपल्या स्वप्नांना पूर्ण करा, जगा आणि जगू द्याहे प्रीती झंगियानीच्या आयुष्याचे ब्रीदवाक्य आहे. प्रीतीच्या वडिलांचे नाव गोविंद झंगियानी आणि आईचे नाव मनीका झंगियानी आहे. प्रीतीने मुंबईच्या जय हिंद महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले.

 

प्रितीने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त मल्याळम, तेलगू, तामिळ, कन्नड, पंजाबी, उर्दू, बंगाली आणि राजस्थानी ह्यासारख्या भाषेतील चित्रपटांत काम केलेले आहे. प्रितीने आपल्या करिअरची सुरुवात ये है प्रेमह्या व्हिडीओ अल्बमने केली होती. त्यानंतर १९९६ मध्ये अल्ताफ रजाच्या पहिला अल्बम तुम तो ठहरे परदेशीह्या गाण्यात ती दिसून आली. तिने १९९९ मध्ये थम्डूआणि मजहविलुसारखे दक्षिण भारतीय चित्रपटांत अभिनय करून आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली.

 

प्रितीने २००० साली बॉलिवूड मध्ये मोहब्बतेंचित्रपटा द्वारे पर्दापण केले. हा चित्रपट खूप हिट ठरला होता. ह्या चित्रपटांत अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय सारखे मोठे मोठे स्टार होते. ज्यात प्रीतीने इतर पाच कलाकार शमिता शेट्टी, उदय चोप्रा, जुगल हंसराज, किम शर्मा आणि जिमी शेरगिल ह्यांच्या सोबत काम केले होते. ह्यानंतर प्रीतीचा लक्षात राहणारा चित्रपट म्हणजे आवारा पागल दिवाना’.

 

चांद के पार चलो’ (२००६), सुख (२००५), चाहत एक नशा (२००५), चेहरा (२००५), एलओसी कारगिल (२००३), अनर्थ (२००२), वाह तेरा क्या कहना (२००२), आवारा पागल दीवाना (२००२) ह्यासारख्या चित्रपटांत तिने काम केले आहे.

 

प्रीती आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील वांद्रा येथे राहते. प्रितीने २३ मार्च २००८ साली अभिनेता प्रवीण डबास ह्यांच्या सोबत लग्न केले. तिचा पती प्रवीण डबास मीरा नायरच्या मान्सून वेडिंगचित्रपटांतून प्रकाशझोतात आला होता. चित्रपट आणि मॉडेलिंग व्यतिरिक्त तो एक स्कुबा ड्रायव्हर सुद्धा आहे. ह्याशिवाय त्याला अंडर वॉटर फोटोग्राफीची आवड आहे.

 

२०१४ साली प्रदर्शित झालेला काश तुम होतेहा तिचा शेवटचा हिंदी सिनेमा होता, त्यानंतर तिने चित्रपट सृष्टीपासून लांब राहणे पसंत केले. काही वर्षे चित्रपटसृष्टी पासून लांब राहिल्यानंतर तिने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.

 

तिने २०१७ साली तावडो - द सनलाईटह्या राजस्थानी चित्रपटांत काम केले. ह्यानंतर तिने भोजपुरी सुपरस्टार रवी किशन सोबत हिंदी सिनेमा जय छठी माँह्या चित्रपटांत काम केले. हा चित्रपट ह्याच वर्षी म्हणजेच ५ एप्रिलला २०१९ ला रिलीज झाला होता. ह्या चित्रपटांत तिने देवीची भूमिका निभावली होती. चित्रपटांत काम केल्यानंतर आता तिने डिजिटल जगात प्रवेश केले आहे.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१८ ऑगस्ट

नेत्या निर्मला सितारामन यांचा वाढदिवस

************

 

जन्म - १८ ऑगस्ट १९५९ (मदुराई)

 

भाजपच्या नेत्या अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांचा आज वाढदिवस.

 

तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्ह्यात मध्यमवर्गीय कुटुंबात निर्मला सितारामन यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील रेल्वेत नोकरीला होते. त्यामुळे त्यांच्या बदल्यांच्या निमित्ताने शालेय जीवनातच निर्मला सितारामन यांनी अनेक शहरं पाहिली.

 

वडिलांची शिस्त आणि आईचं वाचनाचं वेड त्यांनी अंगिकारलं आणि या दोन्ही गोष्टी त्यांना पुढच्या संपूर्ण प्रवासात बहुमोल ठरल्या. सीतालक्ष्मी रामासामी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर पदवी पूर्ण केली.

 

जागतिकीकरण हा त्यांच्या आवडीचा विषय होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर १९८६ साली पराकला प्रभाकर यांच्याशी लग्न करून त्या लंडनला गेल्या. प्रभाकर आणि त्यांचे कुटुंबीय काँग्रेसचे कट्टर समर्थक होते. १९९१ पर्यंत त्या तिथेच होत्या.

 

बी.बी.सी वर्ल्ड सर्व्हिससह दोन कॉर्पोरेट कंपन्या मध्ये त्यांनी काम केलं. सीतारामन यांनी जेव्हा सक्रिय राजकारणात उतरायचं ठरवलं, तेव्हा भाजपची निवड करून सगळ्यांनाच धक्का दिला होता. त्यात सध्याच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा मोठा वाटा होता. त्यांनीच निर्मला यांना भाजप मध्ये येण्याचा सल्ला दिला होता. तो ऐकल्यानं निर्मला यांचं आयुष्याला वेगळीच दिशा मिळाली.

 

२००६ मध्ये निर्मला सीतारामन यांनी भाजप मध्ये प्रवेश केला आणि मागे वळून पाहिलं नाही. तत्पूर्वी २००३ ते २००५ या काळात त्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य होत्या. तिथेच त्यांची ओळख सुषमा स्वराज यांच्याशी झाली होती आणि सुषमांनी सुचवल्या प्रमाणेच २००६ मध्ये त्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं होतं.

 

२०१० मध्ये निर्मला सीतारामन या भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या झाल्या. या पदावर असताना भाजपचा आणि गुजरात मधील मोदी सरकारची बाजू मांडण्याचं काम त्यांनी जबाबदारीनं सांभाळलं. निर्मला सीतारामन् यांचा नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात २०१४ मध्ये राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला.

 

दोन वर्षांच्या कालावधीत संसदेत राफेलच्या मुद्द्यावरुन धुरळा उठला, तेव्हा निर्मला सीतारमण यांनी निकराने खिंड लढवली. खुद्द शाह मोदी यांनीही निर्मला सीतारमण यांचं कौतुक केलं होतं.

 

३ सप्टेंबर २०१७ पासून ते ३० मे २०१९ त्या भारताच्या संरक्षणमंत्री व नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मच्या मंत्रिमंडळात भारताच्या अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहेत.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१८ ऑगस्ट

क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा वाढदिवस

************

 

जन्म - १८ ऑगस्ट १९५६ (मुंबई)

 

टीम इंडियाचे माजी खेळाडू, राष्ट्रीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांचा आज वाढदिवस.

 

संदीप पाटील हे तडाखेबंद फलंदाज म्हणून सर्वांना परिचयाचे असले तरी त्यांच्या कारकीर्दीवर नजर फिरवल्यावर ते निव्वळ फलंदाज न राहता यशस्वी प्रशिक्षक, निवड समितीचे जबाबदार सदस्य, चित्रपट अभिनेते, लेखक, संपादक अशा विविध भूमिकांत समरस झालेले दिसतात. त्यांची ही छबी अष्टपैलूत्वाची साक्ष देते.

 

पक्के मुंबईकर असलेल्या संदीप पाटील यांची क्रिकेट कारकीर्द बहरली ती दादरच्या शिवाजी पार्क मैदानात. वडील मधुसूदन पाटील यांच्याकडून संदीप यांच्याकडे क्रिकेटचा वारसा आला. शिवाजी पार्क, बालमोहन विद्यामंदिर, रुईया कॉलेज, मुंबई विद्यापीठ असा त्यांचा प्रारंभीचा प्रवास हा स्वाभाविकच क्रिकेटच्या जडणघडणीसाठी पोषक ठरला.

 

मुंबईच्या रणजी संघात १९७५ मध्ये स्थान मिळविल्यानंतर संदीप पाटील यांनी मागे वळून पाहिले नाही. २९ कसोटी, ४५ वनडे सामन्यांत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. कसोटी क्रिकेट मध्ये त्यांच्या खात्यात अवघी चार शतके होती पण त्या शतकांनीही स्वतःचे असे स्थान निर्माण केले. त्यातील अ‍ॅडलेड कसोटीत कठीण परिस्थितीत केलेली १७४ धावांची त्यांची खेळी ही सर्वोच्च ठरली. मात्र, इंग्लंड दौऱ्यात बॉब विलीसच्या एकाच षटकात सहा चौकार लगावून त्यांनी पूर्ण केलेले शतक आणि फॉलोऑनच्या छायेत असलेल्या भारतीय संघाला मिळालेला दिलासा भारतीय चाहते कधीही विसरणार नाहीत.

 

संदीप पाटील यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द दीर्घकालीन ठरली नाही, तरी क्रिकेटशी असलेले त्यांचे नाते अतूट राहिले. पाटील यांनी भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवलेच, पण केनया आणि ओमान या देशांनाही त्यांच्या सारखा प्रशिक्षक लाभला आणि या क्रिकेट संघांनी पाटील यांच्या कालखंडात मोठी झेप घेतली.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

************

१८ ऑगस्ट

अभिनेता उदय लागू यांचा वाढदिवस

************

 

जन्म - १८ ऑगस्ट १९५० (पुणे)

 

जेष्ठ मराठी अभिनेता उदय लागू यांचा आज वाढदिवस.

 

उदय लागू यांचा जन्म पुण्यातील व शिक्षण भावे स्कूल व उच्च शिक्षण बी.एम.सी.सी. व मॉडर्न कॉलेज मधे झाले. उदय लागू यांना अभिनयाची आवड असल्याने त्यांनी कॉलेज मधे असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत भाग घेतला. पुरुषोत्तम करंडकात आपल्याला संधी मिळावी म्हणून त्यांनी बी.एम.सी.सी. सोडून मॉडर्न कॉलेज मध्ये अ‍ॅडमीशन घेतली. त्या नंतर त्यांचा डॉ.जब्बार पटेल यांच्या पी.डी.ए शी संबध आला व त्यांनी बसवलेले घाशीराम कोतवाल या नाटकात काम करण्याची संधी मिळाली, (त्या मध्ये प्रमुख १२ ब्राम्हणांच्या पडद्यात पैकी एक अशी वर्णी लागली) आणि मुळात अभिनयाची आवड असलेले उदय लागू हे अभिनेते झाले.

 

त्यांना सुरवातीला पी.डी.ए मध्ये एकांकिका सादरीकरण व साप्ताहिक अभ्यासवर्गातून नाटक व रंगमंचीय गोष्टी बद्दल अनुभव मिळाला. पुढे थिएटर अँकँडमीसाठी, संस्थापक सदस्य झाले आणि उदय लागू यांना प्रायोगिक रंगभूमीचे दरवाजे खुले झाले.

 

त्यांनी संस्थेच्या महापूर, महानिर्वाण, तीन पैशाचा तमाशा, पडघम, क्षितिज, मेक-अप, मी जिंकलो मी हरलो अशा नाटका मध्ये कामे केली. या नाटकातील विविध भूमिकाच्या मुळे त्यांचे नाट्य अभिनेता हे नाव होण्यास मदत झाली.

 

हे सर्व चालू असताना ते प्रथम कमिन्स मध्ये नोकरी करत होते व कामाच्या वेळा सांभाळून ते प्रयोगाच्या तालमी व प्रयोग करत असत. घाशीराम कोतवाल हे नाटक खूप गाजले, परदेशी प्रयोग झाले. घाशीराम कोतवाल, युरोप हून आल्यावर उदय लागू यांना ययाती देवयानी या पौराणिक नाटकातील ययातीच्या भुमिके बद्दल विचारले गेले, व ती भूमिका त्यांनी समर्थ पणे साकारली (भरत नाट्यमंदिर), या मुळे त्यांना रामदास कामत यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली.

 

हे सर्व करत असताना त्यांनी ग्रीप्स थिएटर साठी छान छोटे वाईट मोठे, नकोरे बाबा, पहिलं पान, पण आम्हाला खेळायचं अशी बालनाट्य केली. त्या नंतर प्रायोगीक नाटकांच्या बरोबर उदय लागू दिसले ते, शिवाजी महाराजांच्या भूमिकेत प्रताप गड या नाटकात. या नाटकाचे त्यावेळेला, सुमारे १०० हून अधिक प्रयोग झाले.

 

पुढे उदय लागू यांनी षडयंत्र, सविता दामोदर परांजपे, कन्यादान, गुड बाय डॉक्टर, चि. आईस; अशी व्यावसायिक नाटके करून आपला अभिनय संपन्न केला. नाटका बरोबर, जब्बार पटेल यांच्या सामनाचित्रपटात काम करून त्यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवले. त्यांनी सूर्योदय, राजकारण, धागेदोरे, कालचक्र, साने गुरुजी, पाऊल खुणा, सरपंच भगीरथ, वीस म्हणजे वीस, हरिश्चंद्राची फॅक्टरी अशा ३० हून अधिक चित्रपटात काम केले.

 

उदय लागू यांनी बॉलीवूड मध्येही भूतनाथ रिटर्न, मदारी, तुम्हारी सुलू अशा चित्रपटात कामे करून चरित्र अभिनेता, असा ठसा उमटवला. तसेच लागू यांनी शेर शिवाजी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील इंग्लिश चित्रपटातही काम केलं आहे.

 

उदय लागू यांचे एक वैशिष्ट म्हणजे आपले करीयर शेवट पर्यत वालचंद नगर इंडस्ट्री मध्ये काम करून केले आहे. ते वालचंद नगर इंडस्ट्री मधून चीफ मॅनेजर मार्केटिंग या पोस्ट वरून निवृत्त झाले (नाटकाच्या आवडी मुळे खाजगी नोकरीत काम करून हि तारेवरची कसरत ते आनंदाने करत होते).

 

उदय लागू यांनी शोध, अवंतिका, इंद्धुनष्य, या गोजिरवाण्या घरात, मंगळसूत्र, ती फुलराणी, बाल गंगाधर तिलक, क्राईम पेट्रोल, 24 Hrs, आंबटगोड अशा तीसहून अधिक मराठी व हिंदी मालिकात कामे केली आहेत. त्यातील अवंतिका मधील त्यांची खलनायकी ढंगाची (करपे) भूमिका गाजली होती.

 

मालिकांच्या बरोबर उदय लागू यांनी बँक ऑफ इंडिया, ओनिडा टी.व्ही, सोलर गिझर, ओरल टूथ ब्रश अशा वीस हून अधिक जाहिरातीत काम केले आहेत. आणि अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थाच्या आणि खाजगी कंपनीच्या लघुपटातून कामे केली आहेत. तसेच नाट्यपरीक्षक म्हणून त्यांनी अनेक स्पर्धेत काम केले आहे. त्यांनी नाट्यकर्मी म्हणून अनेक नाट्यशिबिरे घेतली आहेत.

 

उदय लागू यांना अभिनयासाठी १९८६ साली क्षितीज व १९८७ साली मेकअप या नाटकांसाठी दोन वेळा राज्य नाट्य पुरस्कार मिळाला. तसेच त्यांना नाट्य परीषद पुणेचा दोन वेळेला पुरस्कार मिळाला आहे. रंगभूमीची ४० हून अधिक वर्षे सेवा केल्या बद्दल भार्गवराम आचरेकर पुरस्कार व केशवराव दाते पुरस्कार मिळाला आहे.

 

सध्या ते थिएटर अँकेडमीच्या कार्यकारणीवर आहेत, तसेच बालरंगभूमी परीषद पुणे जिल्हा शाखाचे अध्यक्ष असून, बालरंगभूमीचा विकास व शहरी व ग्रामीण भागाचा समन्वय साधणे या साठी काम करत आहेत.

 

संजीव वेलणकर, पुणे

९४२२३०१७३३

संदर्भ : इंटरनेट

 

************

No comments:

Post a Comment